EXCLUSIVE | ….म्हणून आम्ही राष्ट्रवादीत गेलो, शिवसेना सोडणाऱ्या पारनेरच्या नगरसेवकांची खदखद
पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे (Why Shivsena Corporators join NCP in Parner).
अहमदनगर : पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे (Why Shivsena Corporators join NCP in Parner). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला. मात्र, या नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत का प्रवेश केला? याबाबत माहिती समोर आली आहे. पारनेरच्या पाचही नगरसेवकांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली (Why Shivsena Corporators join NCP in Parner).
“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नाही. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला. पारनेरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला”, असं शिवसेनेचे नाराज नगरसेवक म्हणाले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“माजी आमदारांच्या हुकूमशाहीमुळे शिवसेना सोडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. पण, माजी आमदारांमुळे पक्ष सोडवा लागला”, अशी खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘शिवसेनेत पुन्हा परतण्याचा विचार नाही’
“कोणत्याही विकासाची कामे होत नव्हती, म्हणून आम्ही राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही ‘मातोश्री’वर जाऊन इथली परिस्थिती मांडू. पण, तूर्तास तरी शिवसेनेत पुन्हा परतण्याचा विचार नाही”, असं नगरसेवक म्हणाले.
पारनेरमध्ये नेमकं काय झाले?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे अशी राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांची नावं आहेत. त्यांनी 4 जुलै रोजी शिवसेनेला रामराम ठोकत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवसेनेने देखील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये नवी राजकीय खेळी केली. यानुसार शिवसेनेनं कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला.
महाविकास आघाडीत मित्रपक्ष असतानाही राज्यात इतर ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांनाच आपल्या पक्षात घेण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाबद्दल शिवसैनिकांकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे काही तक्रारी आल्याचीही माहिती आहे.