Deepak Kesarkar | एवढ्या आरोपानंतरही राठोडांना मुख्यमंत्री शिंदेंनी संधी का दिली? दीपक केसरकरांनी कारण सांगितलं…
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राठोड यांना मंत्रिपद देण्यावरून सणकून टीका केलीय. मात्र एवढ्या आरोपांनंतर संजय राठोडांना मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात संधी का दिली, याचं उत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलंय.
मुंबईः यवतमाळचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे शिंदे (CM Eknath Shinde) भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होतेय. संजय राठोड आणि सत्तारांसारख्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान कसे काय मिळतेय, यावरून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड दोषी असल्याचा आरोप मविआ सरकार असताना भाजपने केला होता. राठोड यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपने लावून धरली होती. त्यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता शिंदे-भाजप सरकारमध्ये त्यांनाच पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्याने विरोधकांकडून टीका केली जातेय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही यावर सणकून टीका केलीय. मात्र एवढ्या आरोपांनंतर संजय राठोडांना मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात संधी का दिली, याचं उत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलंय.
दीपक केसरकरांनी कारण काय दिलं?
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक भूमिका मांडली. संजय राठोडांविरोधातला लढा असाच चालू ठेवणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. यावर उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर त्याबाबत प्रयत्न केलाच पाहिजे. पण ते आरोप सिद्ध होत नसतील तर असं वक्तव्य करणं योग्य नाही. त्यानंतरही बंजारा समाजाचं म्हणणं होतं की ,राठोडांवर कारवाई केली तर आमच्याकडे दुसरा नेता नाही. यवतमाळमध्ये आमच्याकडे मंत्रिपदासाठी दुसरा चेहरा नव्हता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली असेल…
‘भरत गोगावले नाराज नाहीत’
पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात चर्चेत असलेल्यांपैकी एक नाव म्हणजे भरत गोगावले. मात्र आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं नाही. यामुळे भरत गोगावले नारज असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, भरत गोगावले यांना पुढील टप्प्यात संधी मिळेल आणखी एक जागा वाढली असती तर भरत गोगावले यांना याच टप्प्यात मंत्रिपद मिळाले असते ते नाराज नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. खाते वाटप देखील लवकर होणार आहे, मुख्यमंत्री यासंदर्भातील निर्णय घेतील.
पुढचा टप्पा कधी?
मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या टप्प्यात नाराज झालेल्या मंत्र्यांचे लक्ष आता दुसऱ्या टप्प्यातील यादीकडे लागले आहे. पुढचा विस्तार कधी होतोय, असा प्रश्न विचारला जातोय. यावर दीपक केसरकरांनी म्हटले की, पुढील मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांनी मंत्रिपद…
मंत्रिपद मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना दीपक केसरकर म्हणाले, ‘ माझ्या प्रभागला बऱ्याच वर्षांनी मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे माझ्या प्रभागातील लोक खुश झाली आहेत मी त्यांच्याकडूनच एकनाथ शिंदेंचे आभार मानण्यासाठी इथे आलो आहे. मला कोणतेही खात दिलं तर त्या खात्यामध्ये मला माझी काम करायची इच्छा आहे. खातं महत्त्वाचं नसतं तर काम करायची इच्छा असणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीमध्ये जे मंत्री होते, त्यांना पहिले या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे, अशी इच्छा होती त्या अनुषंगाने मंत्रीपद मिळाला आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही…