Manish Sisodia : नरेंद्र मोदी दोन तीन दिवसात मलाही तुरुंगात टाकतील, त्यांना हे शोभत नाही; सिसोदिया यांचा हल्लाबोल
Manish Sisodia : अरविंद केजरीवाल हा मुद्दा त्यांना खटकत आहे. देशातील लोक केजरीवाल यांना पसंत करत आहेत. पंजाब नंतर संपूर्ण देशात राष्ट्रीय नेता म्हणून केजरीवाल यांच्याकडे पाहिले जात आहे. केजरीवाल हे मोदींना पर्याय झाले आहेत. त्यामुळं भाजप हे सगळं करत आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) कुणी चांगलं काम करताना दिसलं तर त्यांना रोखलं जात, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात जे काम करत आहेत, त्याचा मोदींनाही अभिमान वाटला पाहिजे. मोदी हे काही अब्जाधीश मित्रांसाठी काम करतात, केजरीवाल हे 24 तास देशाचा विचार करून काम करतात. पंतप्रधान मोदींना देशाने इतक मोठा बहुमत दिलं. त्यामुळे मोदींना हे शोभत नाही, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मला येत्या दोन तीन दिवसात मलाही तुरुंगात टाकतील, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया Manish Sisodia) यांनी केला आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, त्या राज्यातील सत्ता ईडी आणि सीबीआयच्या बळावर पाडायची हाच विचार मोदी 24 तास करत असतात. येत्या 2024मध्ये मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) अशी लढत होणार आहे. त्यामुळे मोदी आम्हाला रोखण्यासाठी हे सर्व करत आहेत. त्यामुळे मलाही ते एक दोन दिवसात तुरुंगात टाकतील, असं सिसोदिया यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी काल सीबीआयची धाड पडली. त्यानंतर सीबीआयने 15 जणांवर एफआयआर दाखल केला असून सिसोदिया यांना मुख्या आरोपी केलं आहे. मद्य धोरणात अनियमितता केल्याचा सिसोदिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील एक्साईज पॉलिसी ही देशातील सर्वोत्कृष्ट पॉलिसी आहे, भाजपचे नेते वेगवेगळे आकडे देऊन घोटाळा झाला म्हणतात, 8 हजार कोटींचा घोटाळा म्हणतात, मात्र सीबीआय एफआयआर कॉपीमध्ये एक कोटी रुपयांचा घोटाळा झालाय असं नमूद आहे. पण यात काहीच घोटाळा नाहीय, असंस सांगतानाच गुजरातमध्ये दरवर्षी दहा हजार कोटी एक्ससाईज ड्युटीची चोरी केली जाते, तिथं सीबीआयला का पाठवलं जात नाही?, असा सवाल सिसोदिया यांनी केला.
मोदींनी उद्घाटन केलेल्या हायवेचा घोटाळा दिसत नाही का?
न्यूयॉर्क टाइम्सच्या दोन बातम्यांचा दाखला दिला सिसोदिया यांनी यावेळी दिला. एक बातमी नवी दिल्लीच्या शिक्षण प्रणालीच कौतुक करणारी आहे. तर दीड वर्षांपूर्वीची दुसरी बातमी कोविड काळात गंगा नदीत कशा पद्धतीने प्रेतांचा ढीग लागला होता त्याची आहे. दारू घोटाळा हा मुद्दा नाहीये. मग बुंदेलखंड हायवे मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं आणि रस्ता खचला. मग यात घोटाळा नाही का? त्याबाबत कारवाई का केली जात नाही? असा सवाल करतानाच मी सीबीआय अधिकाऱ्यांचा आभारी आहे. सन्मान राखून त्यांनी तपासणी केली, असं त्यांनी सांगितलं.
केजरीवाल हेच मोदींना पर्याय
घोटाळ्याचा मुद्दा महत्त्वाचा नाही. अरविंद केजरीवाल हा मुद्दा त्यांना खटकत आहे. देशातील लोक केजरीवाल यांना पसंत करत आहेत. पंजाब नंतर संपूर्ण देशात राष्ट्रीय नेता म्हणून केजरीवाल यांच्याकडे पाहिले जात आहे. केजरीवाल हे मोदींना पर्याय झाले आहेत. त्यामुळं भाजप हे सगळं करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
मोदी चांगलं काम रोखतात
मोदी आणि केजरीवालमध्ये एक फरक आहे. एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर मोदी त्याला रोखतात. तर केजरीवाल कोणत्याही चांगल्या कामाचं कौतुक करतात. ज्या दिवशी केजरीवाल यांनी मेक इंडिया कँम्पेन लॉन्च केलं. तेव्हापासून मोदींनी हे सुरू केलं, असा आरोपही त्यांनी केला.