एक असं मंदिर जिथे माँ कालीला नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जातो, कारण ऐकून थक्क व्हाल
आपण अनेक मंदिरांच्या अजब-गजब प्रथा-परंपरा ऐकल्या असतील पण असं एक माता कालीचे मंदिर आहे जिथे देवीला मिठाई, लाडू , खीर वैगरेचा नाही तर नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जातो. त्यातमागचं कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास किंवा त्यांची अख्याईका ऐकून आपल्याला विश्वास बसत नाही. असंच एक मंदिर आहे कालीमातेचं. ज्या मंदिरात देवीला चक्क नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जातो. हे ऐकायला फार विचित्र जरी वाटत असलं तरी हे खरं आहे. आपण सामान्यपणे पाहतो की मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून लाडू, खीर किंवा संपूर्ण जेवणाचा भोग दिला जातो. पण या मंदिरात देवीला चक्क नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जातो.
कालीमातेचं हे मंदिर कोलकात्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. देवीला मिठाईऐवजी नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जातो. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेसाठी आणि सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध नाही तर या अनोख्या परंपरेमुळेही प्रसिद्ध आहे. अनेक लोकं इथे आवर्जून येतात.
चिनी काली मंदिराची कहाणी
एका आख्याइकेनुसार, अनेक वर्षांपूर्वी एक मुलगा खूप आजारी पडला होता. डॉक्टरांनी त्याच्या बरे होण्याची सर्व आशा सोडून दिली होती. मग त्याचे पालक त्याला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे एका झाडाखाली दोन काळे दगड होते, ज्यांची लोक माता काली म्हणून पूजा करायचे. त्यांनी अनेक दिवस आई कालीची प्रार्थना केली आणि चमत्कारिकरित्या तो मुलगा बरा झाला. या चमत्काराने प्रभावित होऊन, मुलाच्या पालकांनी कालीची पूजा करण्यास सुरुवात केली. बंगाली आणि चिनी समुदायाच्या लोकांनी मिळून या ठिकाणी हे कालीमातेचं मंदिर बांधलं आहे आणि तेव्हापासून या मंदिराला चिनी काली मातेचं मंदिर असं नाव पडलं.
View this post on Instagram
नूडल्सचा नैवेद्य का दाखवला जातो?
चिनी पाककृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेले नूडल्स देखील या मंदिरातील पूजेचा एक भाग बनले. जेव्हा चीनमध्ये यादवी युद्ध सुरू झाले तेव्हा अनेक चिनी निर्वासित कोलकात्यात येऊन स्थायिक झाले. त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती आणि परंपरा आणली, ज्यामध्ये देवी-देवतांना विशेष पदार्थ अर्पण करण्याची परंपरा देखील समाविष्ट होती. या लोकांनी त्यांच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणे काली मातेला नूडल्सचा नैवेद्या अर्पण करण्यास सुरुवात केली, जी हळूहळू मंदिराचा कायमचा नैवेद्यचा भाग बनली. आता या मंदिरात नूडल्स, मोमोज आणि इतर चिनी पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात, जे माँ कालीचा आशीर्वाद मानून भाविकांमध्येही वाटले जातात.
चिनी काली मंदिरात कसं पोहोचाल?
हे मंदिर माथेश्वरतला रोड, टांग्रा येथे आहे. येथे पोहोचण्यासाठी, रवींद्र सदन मेट्रो स्टेशनवर उतरून सायन्स सिटी/टोपासियाला जाण्यासाठी बस पकडावी लागते. हे मंदिर आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे सोमवार ते रविवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुले असते. जर तुम्ही कधी कोलकात्याला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.