Navratri 2023 : नवरात्रीत कन्या पूजन आणि त्यांना भोजनदान करण्याला का आहे विशेष महत्त्व?
नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारीकांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. साधारणतः नवरात्री सुरू होताच अनेक जण कन्या पूजा (Kanya Puja) करण्यास सुरुवात करतात.
मुंबई : रविवार, 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत असून महासप्तमी 21 ऑक्टोबर, शनिवारी, महाअष्टमी 22 ऑक्टोबर, रविवारी, महानवमी 23 ऑक्टोबर, सोमवार आणि विजयादशमी 24 ऑक्टोबर, मंगळवारी साजरी केली जाईल. नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारीकांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. साधारणतः नवरात्री सुरू होताच अनेक जण कन्या पूजा (Kanya Puja) करण्यास सुरुवात करतात, परंतु अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व मानले जात असले तरी बहुतेक लोकं सप्तमीपासून कुमारीका पूजा आणि भोजन करण्यास सुरुवात करतात. जे नवरात्रभर उपवास करतात ते दशमीच्या दिवशी मुलीला भोजनदान केल्यानंतरच पारण करतात. दोन ते दहा वर्षे वयोगटातील नऊ कुमारीकांना जेवायला बोलवायले पाहिजे. नऊ क्रमांकाच्या मागे देवीच्या नऊ रूपांचा अर्थ आहे.
अशी आहे धार्मिक मान्यता
1-दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा मानले जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. 2- नऊ वर्षाच्या मुलीला खरे तर दुर्गा म्हणतात, जिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो आणि सर्व कामे पूर्ण होतात. 3- आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात, तिची पूजा केल्याने वादविवादात विजय प्राप्त होतो. 4- सात वर्षांच्या मुलीचे रूप चंडिकेचे मानले जाते. चंडिकेची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते. 5- सहा वर्षांच्या मुलीला ज्ञान, विजय आणि राजयोग देणारी कालिकेचे रूप मानले जाते. 6- पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात आणि तिची पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होते. 7- चार वर्षांची मुलगी शुभ मानली जाते आणि तिच्या पूजेने कुटुंबाचे कल्याण होते. 8- तीन वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते आणि तिची पूजा केल्याने धनधान्य तसेच कुटुंबात सुख-समृद्धी येते. 9- दोन वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतात.
असे करा कन्या पूजा
मुलींना बोलावल्यानंतर प्रथम देवीची पूजा करा आणि कुमारीकांचे पाय धुवून त्यांना योग्य आसनावर बसवा. रक्षासूत्र म्हणजेच मौली धागा प्रत्येकीच्या मनगटावर बांधा. सर्व प्रथम देवीला नैवेद्य दाखवा आणि नंतर कुमारीकांना भोजनदान करा.
शेवटी चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि सर्वांना भेटवस्तू द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)