GT vs CSK, IPL 2023 : आज रिझर्व्ह डेलाही पाऊस पडल्यास काय होणार?, IPLचे नियम काय?; धोनीलाच टेन्शन का?
आयपीएल प्लेइंग कंडिशन्स 16. 11. 2 नुसार, जो संघ ग्रुप स्टेज सामन्यानंतर प्वॉइंट्स टेबलमध्ये टॉप राहून प्लेऑफ क्वालिफाय करते, त्याच संघाला सामना रद्द झाल्यावर विजेता घोषित केलं जातं.
अहमदाबाद : गुजरात विरुद्ध चेन्नईच्या कालच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात पावसाने खेळ केला. पावसामुळे कालचा अंतिम सामना होऊ शकला नाही. आता हा सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी होणार आहे. जर अंतिम सामना ठरलेल्या तारखेलाही नाही झाला तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जातो. त्यामुळे आज गुजरात विरुद्ध चेन्नई सामना रंगणार आहे. मात्र, आजच्या सामन्यावेळीही पाऊस पडला तर…?
जर रिझर्व्ह डेच्या दिवशी पाऊस झाला आणि सामना रद्द झाला तर महेंद्र सिंह धोनीचं स्वप्न भंगणार आहे. म्हणजे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सला विजेती टीम म्हणून घोषित केलं जाणार आहे. तुम्हाला वाटत असेल असं कसं होईल? तर आयपीएलच्या प्लेइंग कंडिशन्समुळे असं होईल. त्यामुळे आयपीएलचे नियम जाणून घ्या.
आयपीएल प्लेऑफचे नियम
आयपीएल प्लेइंग कंडिशन्सच्यानुसार फायनलसोबत एलिमिनेटर, क्वालिफायर-1, क्वालिफायर -2 सामने जर टाय झाले किंवा कोणताच निकाल लागला नाही तर, खालील नियम लागू होतात.
16. 11. 1 : जर फायनलमध्ये विजेता घोषित करायचा असेलतर यात टीम सुपर ओव्हरमध्ये एक दुसऱ्याशी सामना करेल. आणि
16. 11. 2 : जर सुपर ओव्हरही झाल्या नाहीत तर विजेताच्या निर्णय आयपीएल प्लेइंग कंडिशन्सच्या अपेंडिक्स एफ नुसार घेतला जाईल. अपेंडिक्स एफच्या नुसार लीग स्टेजमध्ये जो संघ प्वॉइंट टेबलमध्ये सर्वात वर असेल त्याला विनर घोषित केलं जाईल.
गुजरात संघ चॅम्पियन होणार
आयपीएल प्लेइंग कंडिशन्स 16. 11. 2 नुसार, जो संघ ग्रुप स्टेज सामन्यानंतर प्वॉइंट्स टेबलमध्ये टॉप राहून प्लेऑफ क्वालिफाय करते, त्याच संघाला सामना रद्द झाल्यावर विजेता घोषित केलं जातं. प्लेऑफचा कोणताही सामना रद्द झाल्यास, अशा परिस्थितीत प्वॉइंट्स टेबलच्या हिशोबाने निर्णय होतो. या हिशोबाने पाहिलं तर सध्या गुजरातचा संघ टॉपला आहे. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे गुजरातचा संघ सामना रद्द झाला तर चॅम्पियन बनेल.
गुजरातला पहिल्यांदा हरवलं
सध्याच्या सीजनमध्ये गुजरातने पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला राहून क्वॉलिफाय केलं होतं. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर होती. अशावेळी या दोन्ही संघातच क्वालिफायर 1 सामना खेळवला गेला होता. 23 मे रोजी झालेल्या या सामन्यात चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवला होता. गुजरातच्या विरोधात चेन्नईचा पहिला विजय होता.