टीम इंडियाने टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय शुक्रवारी भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेटरनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे. दरम्यान, टीम इंडियाने काल केवळ सामना जिंकला नाही तर विरोधी संघाच्या खेळाडूंची आणि भारतीय क्रिकेटरसिकांची मनंदेखील जिंकली. सामना संपल्यानंतर स्कॉटलंड संघाने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याकडून खेळातील बारकावे जाणून घेतले. यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि के. एल. राहुल या स्टार्सनी स्कॉटलंडच्या खेळाडूंशी चर्चा केली.