IPL 2022: अखेर मेगा ऑक्शनची तारीख आणि सीजन कधी सुरु होणार ते ठरलं, BCCI सचिवांनीच दिली माहिती
आयपीएलचा (IPL) 15 वा सीजन कधी सुरु होणार? आणि मेगा ऑक्शन किती तारखेला पार पडणार? त्याची तारीख अधिकृतरित्या बीसीसीआयकडून (BCCI) समोर आली आहे.
मुंबई: आयपीएलचा (IPL) 15 वा सीजन कधी सुरु होणार? आणि मेगा ऑक्शन किती तारखेला पार पडणार? त्याची तारीख अधिकृतरित्या बीसीसीआयकडून (BCCI) समोर आली आहे. मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार आहे तसेच 15 व्या सीजनची सुरुवात मार्च अखेरीस होणार असून मे अखेरपर्यंत IPL स्पर्धा चालणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी ही माहिती दिली.
भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आयपीएल स्पर्धेचं आयोजन कसं होणार? या बद्दल बरीच चर्चा सुरु आहे. आयपीएलचा 15 वा सीजन होणार आहे. या संदर्भात आज बीसीसीआय, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि आयपीएल फ्रेंचायजी याची एक महत्त्वाची बैठक झाली. ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्याचा BCCI चा प्रयत्न आहे.
आजच्या बैठकीत बहुतांश संघ मालकांनी भारतात स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. यंदाच्या सीजनमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ आहेत. आयपीएलचे आयोजन भारतातच व्हावे, यासाठी आम्ही आमच्या बाजूने सर्व प्रयत्न करु असे जय शाह यांनी सांगितले.
बीसीसीआय आरोग्य आणि सुरक्षिततेमध्ये कुठलीही तडजोड करणार नाही, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनास्थितीमुळे बीसीसीआय प्लान बी वर सुद्धा काम करत आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडेल. ती जागा लवकरच कळवू, असं जय शाह यांनी सांगितलं. बंगळुरुमध्ये हा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे.
IPL 2022 mega auction on February 12 and 13 BCCI Secretary Jay Shah