IPL 2023 Final Weather Update : अहमदाबादमध्ये आज पुन्हा पावसाचाच ‘खेळ’?; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
IPL 2023 Final Ahmedabad Weather Update : रविवारीही हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी जो पाऊस सुरू झाला. तो रात्री 11 वाजताच थांबला. त्यामुळे आजही अशीच परिस्थिती उद्भवल्यास मात्र, सामन्यावर पुन्हा एकदा विरजन पडू शकतं.
अहमदाबाद : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याच्यावेळी पावसाने हजेरी लावली आणि खेळाचा बेरंग झाला. त्यामुळे कालचा सामना रद्द करण्यात आला. आज रिझर्व्ह डेला या दोन्ही संघात पुन्हा भिडत होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण आजच्या सामन्यातही पाऊस पडल्यास काय होईल? कुणाला विजेता ठरवलं जाईल? अहमदाबादचं आजचं हवामान काय असेल? असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आजचं अहमदाबादचं हवामान जाणून घेऊया.
आयपीएलचे एवढे सामने झाले. कोणत्याच सामन्यात पाऊस पडला नाही. ऐन अंतिम सामन्यावरच पावसाने विरजन टाकलं. त्यामुळे अंतिम सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आधीच या सीझनमध्ये प्लेऑफमधील चारही संघाचा फैसला होण्यासाठीही शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली होती. आता फायनलच्या सामन्याने आतुरता वाढवली आहे. आज होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
फिफ्टी-फिफ्टी अंदाज
हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एक्यूवेदर संकेतस्थळाच्या माहितीनुसार, आज सोमवारी अहमदाबादचं वातावरण स्वच्छ राहील. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी होतील. मात्र, दिवसभरात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. झाला तरी तो नाममात्र असेल. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर काही वेळासाठी हलका पाऊस पडेल. मात्र, ही शक्यताही 50 टक्क्यांपेक्षा कमीच आहे.
तर उशीर होईल
संध्याकाळी 6 वाजल्यानंतरही काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. मात्र, त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान ढग जमा होतील. पण पाऊस पडणार नाही. हवामानाचा हा अंदाज पाहता सामना सुरू होण्यासाठी थोडा उशीर होऊ शकतो.
हलक्या सरीचा अंदाज
दरम्यान, रविवारीही हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी जो पाऊस सुरू झाला. तो रात्री 11 वाजताच थांबला. त्यामुळे आजही अशीच परिस्थिती उद्भवल्यास मात्र, सामन्यावर पुन्हा एकदा विरजन पडू शकतं, असा अंदाज आहे. दिवसभरातील हवामानात काही बदल झाला तरच हे घडू शकतं, असंही सांगितलं जात आहे.
तर गुजरात विजेता ठरणार
रविवारप्रमाणेच सोमवारीही तशीच परिस्थिती राहील. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पावसाच्या परिस्थितीत रात्री 9.35 पर्यंत वाट पाहावी लागेल. या काळात पाऊस सुरू झाल्यास ओव्हर कमी होणार नाही. त्यानंतर ओव्हर कमी होऊ शकतात. जर हे सुद्धा नाही झालं तर 12.06 वाजेपर्यंत वाट पाहिली जाईल. त्यानंतर दोन्ही संघा दरम्यानचा सामना 5-5 ओव्हरचा होऊ शकतो. असं नाही झालं तर मग सुपर ओव्हरमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. जर पाऊस थांबण्याचं नावच घेत नसेल तर मग प्वॉइंट टेबलमधील गुणांच्या आधारे विजेता संघ घोषित केला जाऊ शकतो. तसं झाल्यास गुजरात विजेता ठरणार आहे.