फोनवरून निकाह, गर्भपात अन् 15 कोटींची पोटगी.. शोएब मलिकचं पहिलं लग्न चर्चेत
पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा पूर्व पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. त्यानंतर आता शोएबचं पहिलं लग्न सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
मुंबई : 24 जानेवारी 2024 | पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसऱ्यांदा निकाह केला. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चा असतानाच शोएबने निकाहचा फोटो पोस्ट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता शोएबच्या या तिसऱ्या निकाहनंतर त्याच्या पहिल्या पत्नीचीही सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. शोएब आणि सानियाने 2010 मध्ये निकाह केला होता. त्यापूर्वी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. 29 वर्षीय आयेशा सिद्दिकी नावाच्या एका हैदराबादी तरुणीने शोएबवर हा आरोप केला होता. शोएबने माझ्याशी निकाह केला आहे, असं तिने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर तिने यासोबत त्यांच्या निकाहचे व्हिडीओ पुरावेसुद्धा दिले होते.
‘इकोनॉमिक्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शोएबने आयेशाचे सर्व आरोप फेटाळले होते. याउलट त्याने तिच्यावर ओळख चोरल्याचा आरोप केला होता. शोएबने सांगितलं की त्याने आयेशासोबत (जी माहा या नावानेही ओळखली जात होती) टेलिफोनिक निकाह (फोनवरून निकाह) केला होता. त्या मुलीला शोएब कधी भेटलाच नव्हता. पण दोघांनी एकमेकांचे फोटो पाहिले होते. “जून 2002 मध्ये एके दिवशी मी सकाळी घरातून निघालो आणि मित्राच्या दुकानातून फोन लावला. माझ्याकडे निकाहनामा होता. त्यावर मी स्वाक्षरी केली. मी ज्या मुलीचा फोटो पाहिला होता, तिच्याशीच माझा निकाह झाल्याचं मी समजत होतो”, असं शोएबने स्पष्ट केलं होतं.
Shoaib Malik first wife Ayesha Siddique he married him in 2002#ShoaibMalik pic.twitter.com/T8SzvOhHRe
— ✨💫 Shoaib 💫✨ (@TheDarkShobi23) January 20, 2024
आयेशाच्या कुटुंबीयांनी नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शनचंही आयोजन केलं होतं. तोपर्यंत शोएब आणि आयेशा हे दोघं एकमेकांना भेटलेच नव्हते. 2005 मध्ये शोएबला आपल्यासोबत विश्वासघात झाल्याची जाणीव झाली. त्यावेळी त्याच्या मेव्हण्याने खुलासा केला की त्याचे पुतणे हे सौदी अरबमध्ये माहा सिद्दिकी नावाच्या एका शिक्षिकेला भेटले होते. त्या महिलेनं शोएबची पत्नी असल्याचा दावा केला होता. या गोंधळानंतर शोएबने त्या महिलेला फोन केला तेव्हा त्याला समजलं की फोटोमधील तरुणी आणि हैदराबादची तरुणी पूर्णपणे वेगळ्या आहेत.
दुसरीकडे आयेशा सिद्दिकीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला होता की शोएबने तिच्याशी निकाह केला होता. त्यात तिचा गर्भपातही झाला होता. सिद्दिकीचे नातेवाईक डॉ. शमस बाबर यांनी सांगितलं होतं की तिचा गर्भपात झाला आहे. “आयेशाचा गर्भपात झाला आहे. पण कोणत्या वर्षी हा गर्भपात झाला हे मी सांगू शकत नाही. पोलिसांकडे आम्ही गर्भपाताचे आणि इतर सर्व पुरावे सुपूर्द केले आहेत. आमच्याकडे शोएब मलिकविरोधात पुरेसे पुरावे आहेत”, असं ते म्हणाले होते.
अखेर याप्रकरणी शोएब मलिकला आयेशा सिद्दिकीला 15 कोटी रुपयांची पोटगी द्यावी लागली होती. त्यानंतर 2010 मध्ये त्याने टेनिस स्टार सानिया मिर्झाशी निकाह केला. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएब यांचा इझान हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. लग्नाच्या 14 वर्षांनंतर सानिया आणि शोएब विभक्त झाले आहेत.