नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची उडवली खिल्ली; माजी पाकिस्तानी क्रिकेटरचा व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाकने अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता आणखी एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरने नीना गुप्ता आणि सर विवियन रिचर्ड्स यांची खिल्ली उडवली आहे.
लाहोर : 17 नोव्हेंबर 2023 | पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रझाकने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अभिनेत्री ऐश्वर्या रायची खिल्ली उडवली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर खूप टीका झाली. आता पाकिस्तानच्या आणखी एका माजी क्रिकेटरने एका टॉक शोदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यावरील वर्णभेदी मस्करीला हसून प्रतिसाद दिला. माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष रमीज राजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एक महिला अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर सर विवियन रिचर्ड्स यांच्याबद्दल वाईट कमेंट करते. ही कमेंट ऐकून रमीज राजा जोरजोरात हसू लागतात. त्यांची ही प्रतिक्रिया पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.
संबंधित व्हिडीओमध्ये एक महिला म्हणते, ‘एकदा माझा हृदयभंग झाला, जेव्हा विवियन नीना गुप्ताला घेऊन गेले होते.’ त्यानंतर पुढे ती त्यांच्यावर वर्णभेदी टिप्पणी करते. हा व्हिडीओ पाहताना शोमध्ये उपस्थित असलेले सर्व पाहुणे हसत असतात. ती महिला जेव्हा विवियन रिचर्ड्स यांना ‘कालिया’ म्हणते, तेव्हा रमीज राजा यांच्यासह इतरही जण जोरजोरात हसू लागतात. या व्हिडीओला ‘एक्स’वर (ट्विटर) द क्रिक गाय नावाच्या एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘प्रत्येकजण ऐश्वर्या रायवरील मस्करीमुळे रझाक, गुल आणि आफ्रिदी यांच्यावर टीका करत आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. पण या व्हिडीओकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. ही वाहिनी नीना गुप्ता यांची खिल्ली उडवत आहे आणि ही लोकं सर विवियन रिचर्ड्स यांच्यावर वर्णभेदी टिप्पणी करत आहेत.’
पहा व्हिडीओ
So everyone is calling out Razzak, Gul, and Afridi for that Aishwarya Rai saga, and that’s a good thing, but nobody paid attention to this, this channel was making fun of Nina Gupta, and they were passing racist remarks on Sir @ivivianrichards (1/3) pic.twitter.com/H9qmiJfqL3
— The Crik Guy (@Thecrikguy) November 14, 2023
‘हे किती वाईट आहे. ते क्रिकेटमधील सर्वांत महान खेळाडूंपैकी एक आहेत आणि लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्यावर वर्णभेदी टिप्पणी करत आहेत. जसं काय या लोकांनी गोरं असून आयुष्यात खूप काही यश संपादित केलं आहे. जर तुम्ही सर विवियन यांना पाहिलात, तर ते रमीज राजापेक्षा 1000 पटींनी चांगले दिसतात. मला आशा आहे की नीना मॅडम आणि मसाबा गुप्ता या व्हिडीओला पाहतील आणि रमीज राजाकडून माफीची मागणी करतील’, असंही पुढे लिहिलं आहे.
याआधी वर्ल्ड कप 2023 मधील पाकिस्तान क्रिकेट टीमच्या निराशाजनक परफॉर्मन्सवर टिप्पणी करताना अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर (पीसीबी) टीका केली आणि त्या ओघात अभिनेत्री ऐश्वर्या रायचं नाव घेतलं होतं. सोशल मीडियावरील टीकेनंतर त्याने जाहीर माफी मागितली.