IPL 2022 : कुणी संधीचं सोनं केलं, तर कुणी कामगिरीनं छाप सोडली, वाचा आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंविषयी
आयपीएलमध्ये वय हा फक्त एक आकडा आहे, हे आयपीएलने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. अनुभवी उमेश यादव, रिद्धिमान साहा आणि दिनेश कार्तिक यांच्या दमदार कामगिरीसाठी हा मोसम लक्षात राहील.
मुंबई : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा सीजन यंदाजा विशेष होता. या सीजनमध्ये दोन नवे संघ आणि काही नवे खेळाडू देखील दिसून आले. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती हार्दिकची. हार्दिकच्या (Hardik Pandya) दमदार कामगिरीनं अनेकांचं लक्ष वेधलं. आता पांड्याला भारताचा संभाव्य कर्णधार म्हणून देखील बघितलं जातंय. आयपीएलचं ब्रीदवाक्य ‘हेअर टॅलेंट गेट्स चान्स’ आहे आणि तेच आयपीएलच्या चमकदार ट्रॉफीवर लिहिलेलंय. आयपीएलचा 2022मध्ये अनेक चांगली कामगिरी करणारे खेळाडू दिसून आलेत. यामध्ये अनेकांकडे भारतीय संघाच्या भावी तरबेज फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही बघितलं गेलं. सनरायझर्स हैदराबादकडून पहिल्या संपूर्ण सीजनमध्ये खेळताना उमरान मलिकनं (Umran Malik) 150 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली. त्याच्या कामगिरीनं जगाचं लक्ष वेधलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. त्याच वेळी, युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खाननं लखनौ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीसाठी दमदार खेळ दाखवला. त्यामुळे त्याचीही चर्चा जोरदार झाली.
आयपीएलमध्ये कुणा छाप पाडली?
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये मोहसीन खानने त्याच्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीच्या शानदार प्रदर्शनानं सर्वांचं लक्ष वेधलं. चेन्नई सुपर किंग्जचे मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग, गुजरात टायटन्सचे यश दयाल आणि राजस्थान रॉयल्सचे कुलदीप सेन हे देखील जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये छाप पाडणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये होते. काही युवा फलंदाजांनीही आपण वरच्या स्तरावर खेळण्यास सक्षम असल्याच दाखवून दिल. मुंबई इंडियन्सचे टिळक वर्मा. याचं कर्णधार रोहित शर्मानं कौतुक केलं होतं. रोहितनं या डावखुऱ्या फलंदाजाला भारतीय संघात खेळण्याचा दावेदार असल्याचं सांगितलंय. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग पंजाब किंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मावर खूप खूश होता. त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. मात्र, त्याने मिळालेल्या संधींचा पुरेपूर वापर केला आणि अत्यंत वेगाने धावा केल्याचंही विसरायला नको.
पांड्या भावी कर्णधार?
राहुल त्रिपाठी आणि अभिषेक वर्मा यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये खेळलेल्या ‘अनकॅप्ड’ खेळाडूंमध्ये (ज्यांनी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत) लक्ष वेधले आहे. मात्र, येत्या T20I मालिकेसाठी राहुल त्रिपाठीला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. त्याचवेळी, या मोसमापासून हार्दिक पांड्याने भारताचा भावी कर्णधार म्हणून आपला दावा मांडला आहे. संपूर्ण मोसमातील काही प्रसंग वगळता तो पूर्णपणे शांत दिसत होता. आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका असली तरी त्याने बॉल आणि बॅटसह उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या नेतृत्व कौशल्याची चमक दाखवून टीकाकारांना थक्क केलंय. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं संघाच्या गरजेनुसार बचावात्मक आणि आक्रमक खेळाचा उत्तम समतोल दाखवला. गोलंदाजीतही हार्दिक पांड्याची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली.
वय हा फक्त आकडा
आयपीएलमध्ये वय हा फक्त एक आकडा आहे हे आयपीएलने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. अनुभवी उमेश यादव, रिद्धिमान साहा आणि दिनेश कार्तिक यांच्या दमदार कामगिरीसाठी हा मोसम लक्षात राहील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फिनिशरच्या भूमिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर कार्तिकने भारतीय संघात आणखी एक पुनरागमन केलं. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात उमेशने केकेआरसाठी पॉवरप्लेमध्ये चमकदार गोलंदाजी केली. तर साहाने नंतरच्या सामन्यांमध्ये चॅम्पियन गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर म्हणून संघाला सातत्यपूर्ण सुरुवात करून दिली. अशा प्रकारे आयपीएलमध्ये या सर्वच खेळाडूंनी त्याच्या दमदार खेळाने अनेकांचे लक्ष वेधले.