DC vs RR : संजू सॅमसन राजस्थानचा नवा सिक्सर किंग, ठोकलं षटकारांचं शतक
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात राजस्थानचा जरी पराभव झाला असला तरी राजस्थानच्या कर्णधारानं एक मोठा विक्रम रचला आहे. संजू सॅमसनने अखेरच्या षटकात आवेश खानला षटकार ठोकून मैलाचा दगड पार केला आहे.
अबू धाबी : आयपीएल 2021 मध्ये आज अबू धाबीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये टी-20 सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 33 धावांनी सोपा विजय मिळवला आहे. या विजयासाह दिल्लीने गुणतालिकेत 16 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तसेच प्लेऑफचं तिकीटदेखील कन्फर्म केलं आहे. (Sanju Samson hits 100 sixes while playing for Rajasthan Rpyals)
दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 155 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलेलं नाही. राजस्थानकडून या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. परिणामी राजस्थानचा संघ या सामन्यात निर्धारित 20 षटकात 121 धावांपर्यंतच मजल मारु शकला. त्यामुळे राजस्थानला 33 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
दिल्लीच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाने या सामन्यात योगदान दिलं. नॉखियाने या सामन्यात सर्वाधिक 2 बळी घेतले. तर कगिसो रबाडा, आवेश खान, रवीचंद्नर अश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे राजस्थानला 20 षटकात केवळ 121 धावाच जमवता आल्या.
सॅमसन राजस्थानचा नवा सिक्सर किंग
या सामन्यात राजस्थानचा जरी पराभव झाला असला तरी राजस्थानच्या कर्णधारानं एक मोठा विक्रम रचला आहे. संजू सॅमसनने अखेरच्या षटकात आवेश खानला षटकार ठोकून मैलाचा दगड पार केला आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 100 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. संजू आतापर्यंत 116 आयपीएल सामने खेळला आहे. यात त्याने 127 षटकार ठोकले आहेत. त्यापैकी 100 षटकार हे एकट्या राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ठोकले आहेत. राजस्थानसाठी 100 षटकार ठोकणारा शेन वॉटसन नंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर. अश्विनने वैयक्तिक पहिल्याच षटकात डेव्हिड मिलरला 7 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी यष्टीचित केलं. ही विकेट घेत त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या विकेटसह अश्विनने त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीतल्या 250 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. टी – 20 क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारा ते तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी अमित मिश्रा आणि पियूष चावला यांनी केली आहे.
राजस्थानचा पहिला डाव
तत्पूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आणि अवघ्या 21 धावांत दिल्लीचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने काही वेळ किल्ला लढवला खरा परंतु दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. आधी रिषभ पंत 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिमरन हेटमायरने काही वेळ फटकेबाजी करुन दिल्लीला शतक पूर्ण करुन दिलं. मात्र त्यालाही फार वेळ मैदानात तग धरता आला नाही.
ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. दिल्लीने कसाबसा दिडशे धावांचा टप्पा पार केला. राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन साकरियाने 4 षटकांमध्ये अनुक्रमे 22 आणि 33 धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले. तर राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अखेर निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली.
इतर बातम्या
रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!
माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया
IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी
(Sanju Samson hits 100 sixes while playing for Rajasthan Rpyals)