पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलने देश सोडला
पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू उमर अकमल (Umar Akmal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उमर अकमलने आता क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान सोडला आहे. आता उमर अकमल अमेरिका क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे.
कराची : पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू उमर अकमल (Umar Akmal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उमर अकमलने आता क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान सोडला आहे. आता उमर अकमल अमेरिका क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे. उमर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अर्थात पीसीबीने भ्रष्टाचारविरोधी कारवाईनुसार प्रतिबंध घातला होता. त्याच्यावरील निर्बंध नुकतेच हटवण्यात आले होते.
आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा उमर अकमल हा नियमभंग करणारा क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. मॅच फिक्सिंगसह त्याचे असभ्य वर्तनामुळेही त्याच्यावर कारवाई झाली होती. पाक क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी तर उमर अकमलला मनोरुग्ण म्हटलं होतं. इतकंच नाही तर तुला उपचाराची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
उमर अकमलचा करार
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय उमर अकमलने नार्दर्न क्रिकेट कॅलिफोर्निया असोसिएशनसोबत (Northern California Cricket Association) करार केला आहे. हा करार करताना त्याने भविष्यातही आपण उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्याचे पाकिस्तानकडून क्रिकेट खेळण्यासाठीचे दरवाजे आपोआप बंद झाले आहेत. तो सध्या कॅलिफोर्निया जाल्मी संघाचं प्रतिनिधीत्व करत आहे.
उमर अकमलने पीसीबी क्रिकेट असोसिएशन टी 20 स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यामध्ये अकमलने पंजाब सेकंड इलेव्हनकडून खेळताना 0, 14, 7, 16 आणि 29 धावा केल्या होत्या. त्यानंतरच त्याने कॅलिफोर्नियाला जाण्याचा निर्णय घेतला. कायदे आझम ट्रॉफी ही स्पर्धा 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
उमर अकमलची कारकीर्द
उमर अकमलला पाकिस्तानच्या टी 20 संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. उमर अकमलने पाकिस्तानकडून 16 कसोटी, 121 वनडे आणि 84 टी 20 सामने खेळले आहेत.
उमर अकमलने कसोटीत 35.82 च्या सरासरीने 1003 धावा केल्या. वन डेमध्ये 34.34 च्या सरासरीने 3194 धावा ठोकल्या. तर टी 20 मध्ये 26 च्या सरासरीने 1690 धावा केल्या.
उमर अकमल हा पाकिस्तान सुपर लीगच्या पाचव्या हंगामापूर्वी संशयास्पद प्रकरणांमध्ये आढळला होता. त्यावेळी पाक क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केलं होतं. त्याच्यावर भ्रष्टाचाराचं प्रकरण लपवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर PCB ने त्याच्यावर 18 महिन्यांची बंदी घातली होती.
संबंधित बातम्या
पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगची ऑफर : उमर अकमल