Thane : दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उद्यापासून रंगणार विजय हजारे रणजी ट्रॉफीचे क्रिकेट सामने
यंदा विजय हजारे ट्रॉफीच्या पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. गेले दोन दिवस या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम संपन्न झाले असून 8, 9, 11, 12 आणि 14 डिसेंबर, 2021 रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 25 वर्षानंतर यंदा पाहिल्यांदाच होणारे विजय हजारे रणजी क्रिकेट सामने उद्यापासून सुरू होत असून संपूर्ण स्टेडियम सामन्यासाठी सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. दरम्यान ठाणेकरांसाठी ही अभियानाची गोष्ट असल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय हजारे रणजी ट्रॉफी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत नमूद केले.
पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार
यंदा विजय हजारे ट्रॉफीच्या पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. गेले दोन दिवस या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम संपन्न झाले असून 8, 9, 11, 12 आणि 14 डिसेंबर, 2021 रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणीना उजाळा दिला. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यापुढे आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी तसेच डे-नाईट सामन्याच्यादृष्टीने स्टेडियमच्या अत्याधुनिक करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी नगरविकास विभागाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात लागणाऱ्या गोष्टीचा सविस्तर प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.
आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार
नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे. या मैदानावर रणजी क्रिकेट सामने होत असून ही आनंदाची बाब असून भविष्यात याठिकाणी आयपीएल तसेच इतर विविध सामने खेळविले जातील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.
25 वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सामने
तर तब्बल 25 वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडियमवर हे सामने होत असून ही अभिमानाची गोष्ट आहे. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार काही काळ क्रिकेट सामने बंद होते परंतु सन 2018 मध्ये महापालिकेने क्रांतिकारी निर्णय घेवून मैदानावरील स्थानिक कार्यक्रम बंद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले. सध्या बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार या मैदानावर सामने होत आहेत. या स्टेडियमवर नवनवीन आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशन यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
सचिनने दिली स्टेडियमला भेट
सचिन तेंडुलकरने नुकतीच स्टेडीयम भेट दिली असून विकेटचं आणि आउट फिल्ड काम अप्रतिम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 2020 च्या जानेवारीमध्ये बीसीसीआय लेव्हल – 1 च्या महिलांच्या 12 मॅचेस खेळविण्यात आल्या आहेत. तसेच दादोजी कोंडदेव स्टेडीयम हे आता बीसीसीआयच्या पॅनलवर आल्याने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी स्वतःच्या अकॅडमीसाठीचे चित्रीकरण करण्यासाठी स्टेडीयमची निवड केली आहे. गेली अडीच वर्ष कलकत्ता नाईट राईडर्सच्या संघातील खेळाडू स्टेडीयमवर प्रॅक्टीस करत आहेत.