IPL 2023 : छा गए गुरू… भावाची कॉपी करत क्रिकेटचे धडे गिरवले; IPLमध्ये येताच 15 वर्ष जुना विक्रम मोडला
विवरांतसाठी सामन्याचा शेवट चांगला ठरला नाही. त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. एक षटक त्याने टाकलं. पण त्याचं हे षटक हैदराबादला महागात पडलं. त्याने एका षटकात 19 धावा दिल्या.
मुंबई : वय अवघे 23 वर्ष. आयपीएलमध्ये डेब्यू केलं. दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली अन् त्याने संधीचं सोनं केलं. केवळ सोनंच केलं नाही, तर त्यांने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडत विक्रमही प्रस्थापित केला. या अष्टपैलू खेळाडूचं नाव आहे. विरांत शर्मा. विरांत शर्मा सनराईजर्स हैदराबादकडून खेळतोय. आयपीएल 2023मध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. पण जी संधी मिळाली त्यात त्याने आपण दखलपात्र आहोत हे दाखवून दिलं. सीजनच्या शेवटच्या मॅचमध्ये त्याला मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायला मिळाले अन् त्याने शानदार अर्ध शतक लगावलं. या शेवटच्या सामन्यात हैदराबाद पराभूत झाला. पण विवरांत मात्र, सुपरहिट ठरला.
वानखेडे स्टेडियमवर हैदराबाद विरुद्ध मुंबई दरम्यान रोमांचक सामना पार पडला. दोन्ही संघाला प्लऑफमध्ये स्थान निर्माण करायचं होतं. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले होते. या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि लक्ष्यभेदी ठरला तो मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन. तसं पाहिलं तर कालची मॅच ही कॅमरनचीच होती. कॅमरनने स्फोटक शतकी खेळी खेळली आणि मुंबईला विजय मिळवून दिला. मात्र, असं असलं तरी विवरांतला खेळवण्याचा हैदराबादचा निर्णय योग्य ठरला. एवढेच नव्हे तर विवरांतच्या रुपाने हैदराबादलाही एक अष्टपैलू खेळाडू गवसला.
15 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
जम्मू-काश्मीरसाठी खेळणाऱ्या विवरांतने या सीजनमध्ये डेब्यू केला होता. दोन मॅचही झाल्या होत्या. पण त्याला संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या सामन्यात खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं. मुंबई विरुद्धच्या सामन्यात विवरांतला सलामीला उतरवण्यात आलं. या सामन्यात संधी मिळताच या डावखुऱ्या फलंदाजाने अप्रतिम कामगिरी करून दाखवली. त्याने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक ठोकलं.
त्याने बाद होण्यापूर्वी 69 धावा केल्या होत्या. त्यात 9 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. ही खेळी त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. शिवाय त्याने ही खेळी करत एक विक्रमही मोडला. त्याने 15 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला. आयपीएलच्या इतिहासात पदार्पणातच एखाद्या खेळाडूने 69 धावा ठोकण्याचा हा पहिलाच विक्रम आहे. या पूर्वी स्वप्नील असनोदकरने 60 धावा केल्या होत्या.
मात्र, विवरांतसाठी सामन्याचा शेवट चांगला ठरला नाही. त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. एक षटक त्याने टाकलं. पण त्याचं हे षटक हैदराबादला महागात पडलं. त्याने एका षटकात 19 धावा दिल्या. षटक पूर्ण होताच त्याच्या पायाला जखम झाली. त्यामुळे तो मॅचमध्ये खेळू शकला नाही. त्याला फिजिओ आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मैदानाबाहेर जावं लागलं.
Viv-a la vida ?
A maiden half-century for Vivrant ?#IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL #MIvSRH #EveryGameMatters | @SunRisers pic.twitter.com/aBIbmXfCUC
— JioCinema (@JioCinema) May 21, 2023
संघर्ष आणि भावाची कॉपी
अथक संघर्षानंतर विवरांत आयपीएलपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं. तर 15 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले. त्याचा मोठा भाऊ विक्रांतने त्याला सांभाळलं. विक्रांत स्वत: क्रिकेटपटू होता. पण अचानक घराच्या जबाबदाऱ्या आल्याने त्याने क्रिकेट सोडलं. मात्र, भावाला त्याने क्रिकेटपटू बनवलं.
जेव्हा मी कोचिंगसाठी क्रिकेट अकादमीत जायचो. तेव्हा विवरांत माझ्यासोबत यायचा, असं विक्रांतने एका मुलाखतीत सांगितलं होतं. विक्रांत स्वत: डाव्या हाताने स्पिन गोलंदाजी करायचा. मोठ्या भावाला पाहूनच विवरांतही डाव्या हातानेच स्पिन गोलंदाजी करू लागला. त्याने पुढेही भावालाच फॉलो केलं. विवरांत मागच्या सीजनपर्यंत हैदराबादचा नेट बॉलर होता. लिलावात सनराईजर्सने विवरांतला 2.60 कोटीत खेरीदी केलं होतं.