T20 World Cup: ‘आम्ही सामन्यात धाडसंच दाखवलं नाही,’ न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराट कोहलीचं मत
विराट कोहलीला आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यंदा टी20 विश्वचषकात मात्र भारत कमाल करेल असे वाटत होते. पण यंदाही निराशाच भारताच्या पदरी पडेल असे वाटत आहे.
T20 World Cup: भारतीय टी20 क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार म्हणून विराट कोहलीचा (Virat Kohli) हा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup-2021) शेवटची स्पर्धा आहे. यानंतर तो टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं त्याने स्वत:हून सांगितलं आहे. त्यामुळे जगातील अव्वल फलंदाज असणाऱ्या कोहलीला यंदाही आयसीसीची ट्रॉफी मिळवता येणार नाही. आतापर्यंत आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या विराटसाठी यंदाच्या टी20 विश्वचषकातील आव्हानही जवळपास संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सामन्यानंतर मीडियाशी बोलताना विराट कमालीचा नाराज दिसत होता.
स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस पराभूत झाल्याने भारताची पुढील फेरीची वाट अवघड केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 10 विकेट्सनी आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागल्याने टीम इंडियाचं पुढील फेरीत पोहोचणं कठीण झालं आहे. दरम्यान सामन्यानंतर बोलताना निराश विराटने संघाचा आत्मविश्वास आणि धाडसं कमी पडल्याचं सांगितलं.
काय म्हणाला विराट?
सामन्यानंतर भारतीय संघाकडून नेमकं काय झालं, ज्यामुळे असा पराभव झाला हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विराट म्हणाला, ”हे अगदीच विचित्र होतं, सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाजूने आम्ही धाडसी नव्हतो. गोलंदाजी अधिक मिळाली नसली तरी फलंदाजीवेळी योग्य शॉट्स न खेळता आल्याने आम्ही नीट धाडस दाखवलं नाही. आमचा मैदानातील वावर आणि न्यूझीलंडचा आत्मविश्वास यात फरक होता. ज्यामुळे सुरुवातीपासून आमच्यावर दबाव होता.’ तसंच पुढे बोलताना विराट म्हणाला, ”प्रेक्षक हे आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे आणि प्रत्येकाने एक संघ म्हणून त्याचा सामना केला पाहिजे. तरच सर्व दबावातून बाहेर येऊन खेळता येऊ शकते.”
असा गमावला भारताने सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जिंकणारा संघ निवडत असल्याप्रमाणे गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यावेळी सूर्यकुमारच्या जागी इशान संघात असल्याने सलामीला राहुलसोबत तो आला. पण तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र एक-एक करत सर्व फलंदाज तंबूत परतले. संपूर्ण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दीक पंड्या (23) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 26) यांनीच केल्या. ज्यामुळे भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.
यानंतर अवघ्या 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी दाखवली. सलामीवीर मार्टीन गप्टीलने 3 चौकार लगावत 20 धावा केल्या. चौथ्या षटकात बुमराहने त्याची विकेट घेतली. ज्यावेळी भारताच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर दुसरा सलमीवीर मिचेलने कर्णधार केनच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. तर केनने 31 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेने 2 धावांची मदत करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात बुमराह सोडता भारताच्या गोलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने न्यूझीलंडचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी
(we are not brave enough in match says virat kohli after match against new zealand in T20 world cup)