विनोद कांबळीची कोणत्या कोणत्या आजारांशी झुंज?, दुसऱ्या आजाराने सर्वच चिंतेत; नेमकं काय झालं?
एकेकाळी धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जात असलेला आणि स्थानिक क्रिकेटमध्ये वर्गमित्र मास्टल ब्लास्टर सचिन बरोबर विक्रमी भागीदारी करणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आजाराने ग्रस्त झालेला आहे. कांबळी आणि सचिन यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमातील व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांनी त्याला मदत करण्याची तयारी देखील दाखविली आहे.
डावखुरा शैलीदार धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीची इनिंग कोणालाही नाही आठवणार ? परंतू सध्या त्याची जवळपास विकलांग अवस्था पाहून अनेकांना धक्का बसलेला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू असलेल्या विनोद कांबळी हा अनेक गंभीर आजारांचा सामना करीत आहे. अलिकडे समोर आलेल्या एका व्हिडीओतर कांबळीला धड बसल्या जागेवरुन उठता येत नसल्याचे दिसले होते. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चलबिचल झाली होती. काय आहे विनोद कांबळीचा नेमका आजार हे पाहूयात…
विनोद कांबळी याच्या अलिकडच्या शारिरीक समस्या या काही नव्या नाहीत.या क्रिकेटपटूनला गंभीर शारीरिक आजारांचा इतिहास आहे. साल २०१३ मध्ये कार चालवित असताना विनोद कांबळी याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होती. ही घटना त्याची प्रकृती नाजूक असल्याचे स्पष्ट करते. खास करुन कांबळी सारख्या सक्रीय खेळाडूला देखील हे धोकादायक ठरू शकते. याआधी साल २०१२ मध्ये कांबळीला त्याच्या दोन धमन्यांमध्ये ब्लॉक ठीक करण्यासाठी एंजिओप्लास्टी करावी लागली होती. त्याच्या शारीरिक विषयक त्रासाचा एकूणच त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
डिप्रेशनचा सामना
विनोद कांबळी याला नैराश्याचा देखील सामना करावा लागत आहे. यासंदर्भात विनोद कांबळी याने एकदा मोकळेपणे सांगितले होते. करीअरमधील अपयश आणि इतर कारणाने तो गंभीर डिप्रेशनचा सामना करीत आहे.
मद्य सेवनाचा दुष्परिणाम
नैराश्यामुळे कदाचित विनोद कांबळी मद्याच्या आहारी अधिकच गेला असावा असे म्हटले जात आहे. त्याने मद्य सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी त्याने व्यसनमुक्ती केंद्रातून ट्रीटमेंट देखील घेतल्याचे म्हटले जात आहे. तरीही या व्यसनावर तो मात करु शकलेला नाही.
कांबळी याच्या मदतीसाठी क्रिकेटर आले धावून
महान क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमात त्याला त्याचा सवंगडी सचिन तेंडुलकर सोबत हस्तांदोलन करताना अनेकांनी पाहीले. यावेळी सचिनला त्याला काही सांगायचे होते की त्याच्याजवळ त्याला बसवायचे होते वा त्याची गळाभेट घ्यायची होती? मात्र कांबळीपासून त्याला दूर करण्यात आल्याची चित्रफीत प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यानंतर कांबळी याची अवस्था जगासमोर आली. त्याचा एक मित्र आणि फर्स्ट क्लास अंपायर कुटो याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की विनोदला अनेक गंभीर आजार आहेत. त्याला पुनर्वसन केंद्रात नेणे काही उपयोगाचे नाही. कांबळी १४ वेळा पुनर्वसन केंद्रात जाऊन आला आहे. तीन वेळा त्याला आम्ही स्वत: वसईतील पुनर्वसन केंद्रात नेले असल्याचे तो म्हणाला.
कपिल देव यांचा पुढाकार
कांबळीची स्थिती पाहून प्रख्यात माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितले की त्याला जर पुनर्वसन केंद्रात जाऊन बरे व्हायचे असेल तर आम्ही त्याचा खर्च उचलू शकतो. परंतू त्याला स्वत: त्यासाठी उपचार करण्याची तयारी दाखवावी लागेल. तो जर पुनर्वसन केंद्रात ( नशामुक्ती केंद्र ) जायला तयार असेल तर आम्ही बिल भरायला तयार आहोत मग भले उपचार लांबला तरी आम्ही मागे हटणार नाही असे कपिल देव यांनी म्हटले आहे.