अखेर पैलवान आखाड्यात चितपट, बृजभूषण सिंह यांच्यावर मोठी कारवाई; 7 तासाच्या बैठकीत काय घडलं?
गेल्या तीन दिवसांपासून खेळाडू धरणे आंदोलन करत होते. दिल्लीच्या जंतरमंतरवर ही धरणे आंदोलने सुरू होती. बुधवारी कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसहीत 30 कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसले होते.
नवी दिल्ली: लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर अखेर बृजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशीपूर्ण होईपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बृजभूषण सिंह यांना मोठा झटका मानला जात आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कुस्तीपटूंनी आपलं धरणं आंदोलनही मागे घेतलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केलं होतं. काल या कुस्तीपटूंनी पुन्हा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. तब्बल सात तास ही बैठक चालली. त्यानंतर रात्री उशिरा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत एक पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर केला.
चौकशी समिती स्थापन
बृजभूषण सिंह यांची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाईल. या समितीतील सदस्यांची नावे सकाळी घोषित केली जातील. ही समिती चार आठवड्यात आपली चौकशी पूर्ण करेल. डब्ल्यूएफआय आणि त्याच्या प्रमुखाच्या विरोधातील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जाईल.
तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर केले जात आहे. चौकशी होईपर्यंत सिंह हे अध्यक्षपदाच्या दैनिक कार्यापासून दूर राहतील आणि चौकशीला सहकार्य करतील, असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.
72 तासात उत्तर मागितले
आम्ही तब्बल सात तास चर्चा केली. यावेळी कुस्तीपटूंनी कुस्ती संघावरील आरोपांची माहिती दिली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकण्यात आल्या आहेत. खेळाडूंच्या आरोपानंतर आम्ही डब्ल्यूएफआयला नोटीस बजावली होती. 72 तासात नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुस्ती संघाचे अध्यक्ष हे अध्यक्षपदाच्या दैनिक कार्यापासून दूर राहतील आणि चौकशीला सहकार्य करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
आंदोलन मागे घेत आहोत
यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही मीडियाशी संवाद साधला. चौकशी निष्पक्ष होईल अशी आम्हाला आशा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्र्याने आमच्या मागण्या ऐकल्या आणि योग्य ते आश्वासन दिलं आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यामुळेच आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
तीन दिवस आंदोलन
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून खेळाडू धरणे आंदोलन करत होते. दिल्लीच्या जंतरमंतरवर ही धरणे आंदोलने सुरू होती. बुधवारी कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसहीत 30 कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसले होते. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.