First Women Maharashtra Kesari | राज्याला पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळाली! थरारक सामन्यात सांगलीच्या प्रतीक्षाने मारली बाजी
महाराष्ट्राला पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळाली आहे. सांगलीची प्रतीक्षा रामदास बागडी हिने कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.
सांगली : महाराष्ट्राला पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळाली आहे. सांगलीची प्रतीक्षा रामदास बागडी हिने कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. विशेष म्हणजे महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अतिशय थरारक ठरला. कल्याणच्या वैष्णवी पाटीलने सगल चार गुण मिळत प्रतीक्षाचं टेन्शन वाढवलेलं. पण शेवटच्या क्षणात प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करत चार गुण मिळवले. त्यामुळे पहिल्या महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा मिळवण्यात प्रतीक्षाला यश आलं.
प्रतीक्षा रामदास बागडी ही 21 वर्षांची असून तिचं वजन 76 किलो इतकं आहे. ती सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान आहे. ती सांगली शहरातील यशवंत नगरमधील वसंतदादा कुस्ती केंद्र मध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक सुनील चंदनशिवे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रतीचे वडील रामदास बागडी हे पोलीस हवालदार आहेत. प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे. ती ढाक, टांग मारणे डावात तरबेज आहे.
दुसरीकडे पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेली कल्याणती वैष्णवी पाटील ही 19 वर्षांची आहे. ती कल्याणची महिला पैलवान आहे. ती कल्याणच्या नांदीवली परिसरातील जय बजरंग तालीम संघ येथे सराव करते. तिने विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप ब्राँझ मिडलची कमाई. तिला प्रशिक्षक प्रज्वलित ढोणे यांचे मार्गदर्शन मिळते. ती सालतु डावात तरबेज आहे.
महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर प्रतीक्षाची पहिली प्रतिक्रिया
“खूप छान वाटतंय. पहिली महाराष्ट्र महिला केसरीची गदा माझ्या खांद्यावर आलेली आहे. सगळ्यांचं कष्ट सार्थकी ठरलेली आहे. महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठेवली हीच मोठी गोष्ट आहे. मी पैशांसाठी खेळलेली नाही. खूप मोठा मान मिळालेला आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाला मी गदा अर्पित करते. माझ्यासोबत माझे वडील खूप कष्ट करत आहेत. माझ्या कुटुंबियांचा मला पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मेहनतीला हे यश आलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया प्रतीक्षाने दिली.