Ashleigh Barty Retires: ‘नंबर 1 रहाण्यासाठी आता मी….’ अॅशली बार्टीने प्रामाणिकपणे सांगितलं निवृत्तीमागचं खरं कारण
Ashleigh Barty Retires: महिला एकेरीतील नंबर 1 टेनिसपटू अॅशली बार्टीने (Asleigh Barty)निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने याआधीही टेनिसमधून ब्रेक घेतला होता.
मुंबई: महिला एकेरीतील नंबर 1 टेनिसपटू अॅशली बार्टीने (Asleigh Barty)निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने याआधीही टेनिसमधून ब्रेक घेतला होता. पण यावेळी ती पुनरागमनासाठी तयार नाहीय. बार्टीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना आपल्या या निर्णयाची माहिती दिली. अॅशली बार्टीचा ऑस्ट्रेलियातील सुपरस्टार टेनिसपटूंमध्ये (Women tennis player) समावेश होतो. यावर्षाच्या सुरुवातीलाच तिने ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open) किताब जिंकला होता. 44 वर्षात ऑस्ट्रेलियासाठी किताब जिंकणारी ती पहिली महिला ऑस्ट्रेलियन टेनिसपटू होती. बार्टी सध्याच्या घडीला नंबर 1 टेनिसपटू आहे. ती निवृत्ती घेईल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. तिच्या या निर्णयाने चाहत्यांबरोबर टेनिस विश्वातील दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी माझे टेनिस करीयर इथेच संपवतेय, असं बार्टीने जवळचे मित्र आणि पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. बार्टीने आपल्या टेनिस करीयरमध्ये तीन ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत.
आता माझ्यात इच्छाशक्ती राहिलेली नाही
“नंबर 1 स्थानावर रहाण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी मी आता तयार नाहीय. मी अनेकदा माझ्या टीमला सांगितलं की, माझ्यामध्ये ती ताकत आणि इच्छाशक्ती नाहीय. मी शारीरिक दृष्ट्या टेनिस खेळण्यासाठी स्वत:ला तयार करु शकत नाहीय. मी आता जास्त काही करु शकते असं मला वाटत नाही. मी या खेळासाठी सर्व काही केलं. मी खूश आहे. माझ्यासाठी हेच खरं यश आहे” असं बार्टी तिच्या निवृत्तीबद्दल बोलताना म्हणाली.
View this post on Instagram
बऱ्याच दिवसांपासून निवृत्तीचा विचार घोळत होता
“मी निवृत्तीचा निर्णय अचानक घेतलेला नाही. मी मागच्यावर्षी विम्बलडनपासून निवृत्ती घेण्याचा विचार करत होती. मी बऱ्याच काळापासून निवृत्तीचा विचार करत होती. माझ्या करीयरमध्ये खूप शानदार क्षण आले, जे माझ्यासाठी खूप खास होते. मागच्यावर्षी विम्बलडनने एक खेळाडू म्हणून मला बदललं. ते माझं स्वप्न होतं” असं बार्टीने सांगितलं.