‘या’ नेत्याने स्मशानभूमीही सोडली नाही, म्हसणवटीत चक्क बारबाला नाचवल्या; पैसेही उधळले
अशा प्रकारचे कार्यक्रम होता कामा नये. त्या कार्यक्रमात लहान मुलंही होते. अशा कार्यक्रमातून काय संदेश द्यायचा आहे? अश्लील गाणी सुरू झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्यांनीच त्याला आक्षेप घ्यायला हवा होता.
पाटणा: बिहारमध्ये लग्न आणि वाढदिवसाच्या निमित्ताने कोण काय करेल याचा नेम नाही. बिहारमध्ये लग्न सोहळे आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमात सर्रासपणे अश्लील गाणी वाजवली जातात. या गाण्यांवर बंदी घालण्याची मागणीही लोकांकडून अनेकदा केली जाते. मात्र, तरीही त्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाही. आता तर लोकांनी अशा कार्यक्रमांसाठी स्मशानभूमीही सोडली नाही. बेतियामध्ये एका स्मशानभूमीच्या उद्घटानावेळी आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. या स्मशानभूमीतच कानठळ्या वाजवणाऱ्या आवाजात अश्लील गाणी लावण्यात आली. या गाण्यांवर चक्क बारबाला नाचवण्यात आल्या. एका नेत्याने तर या बारबालांवर चक्क पैशांची उधळणच केली.
चनपटियाच्या गीधा पंचायतमधील बारी टोला पोखरा येथील ही घटना आहे. या ठिकाणी स्मशानभूमीचं उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने स्मशानभूमीतच आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. यावेळी अश्लील भोजपुरी गाण्यावर बारबाला नाचवल्या गेल्या. या कार्यक्रमाला प्रखंड प्रमुख, उपप्रमुख आणि आसापासच्या गावातील सन्माननीय लोक उपस्थित होते.
सर्वच जण आर्केस्ट्राचा आनंद घेत होते. कोणीच स्मशानभूमीत बारबाला नाचवल्या जात असल्याचा विरोध केला नाही. उलट कार्यक्रमाचा आनंद घेण्यात सर्वच तल्लीन झाले होते. तर काही नेते मंडळी बारबालांवर पैशांची उधळण करत होते. या बारबालांना नृत्य करण्यास प्रोत्साहन देत होते. प्रखंड प्रमुख राजेंद्र बैठा यांनी बारबालांवर पैशांची उधळण केल्याचा आरोप होतोय.
अन् गाणी बंद केली
या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी चनपटियाचे आमदार उमाकांत सिंह ही आले होते. उमाकांत सिंह आल्याने आयोजाकांनी घाबरून गाणी बंद केली. सिंह यांच्याकडूनच या स्मशानभूमीचं उद्घाटन करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
लहान मुलांची हजेरी
ऑर्केस्ट्राच्याया कार्यक्रमाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भोजपुरीतील एका अश्लील गाण्यावर एक नर्तकी डान्स करताना दिसत आहे. असंख्य लोक तिचा नाच पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओत लहान मुलेही दिसत आहे. या प्रकारावर प्रखंड प्रमुख राजेंद्र बैठा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला तिथे जबरदस्ती बसवण्यात आलं. मी नर्तकीला पैसे दिले नाही, असं राजेंद्र बैठा यांनी सांगितलं. ही बारबाला डान्स करत असताना राजेंद्र बैठा पैशांची उधळण करत होते, असा आरोप केला जात आहे. त्यावर बैठा यांनी हा खुलासा केला आहे.
सरपंचाकडून निषेध
अशा प्रकारचे कार्यक्रम होता कामा नये. त्या कार्यक्रमात लहान मुलंही होते. अशा कार्यक्रमातून काय संदेश द्यायचा आहे? अश्लील गाणी सुरू झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्यांनीच त्याला आक्षेप घ्यायला हवा होता. पण तेच लोक या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. मी या घटनेचा निषेध करते, असं गीधा पंचायतीच्या सरपंच तारा देवी यांनी सांगितलं.