जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले राम भजन, केला देवी मातेचा जयजयकार
Farooq Abdullah Sings Ram Bhajan: मी अनेक वर्षांपासून विविध मंदिरांमध्ये राम भजन गात आहे. यामुळे माझी मतपेटी कमी होईल किंवा ती जाईल, यासंदर्भात मी चिंता करत नाही. भगवान रामसंदर्भात माझी श्रद्धा आहे, असे जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुला यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त ठरलेले कलम 370 रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयावर जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फ्रन्स आणि फारुख अब्दुला यांच्याकडून विरोध करण्यात आला. परंतु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी कौतूक केले होते. ते म्हणाले की, ‘मी नेहमीच प्रभू रामाची मनापासून स्तुती केली आहे.’ आता फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कटरामधील हा व्हिडिओ आहे. त्यात फारुख अब्दुला प्रभू रामाचे भजन गातांना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
काय आहे व्हिडिओमध्ये
व्हिडिओमध्ये फारुख अब्दुल्ला भगवान राम यांच्यासंदर्भात आपली श्रद्धा दाखवत आहेत. ते “मोरे राम” हे भजन सूर लावून गात आहेत. त्यांच्यासोबत काही इतर लोकही भजन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक जण फारुख अब्दुल्ला यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे सामाजिक सलोखा निर्माण होणार असल्याचे म्हणत आहेत.
जितका राम तुमचा तितका आमचा
नॅशनल कॉन्फ्रॉन्सचे प्रमुख डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले की, मंदिराचे दरवाजे उघडल्याने लोकांची मनेही उघडतील. देशात मुस्लिमांविरुद्ध पसरलेला द्वेष संपेल. ही माझी प्रार्थना आहे आणि परमेश्वर माझा आवाज ऐकेल. राम जितका तुमचा आहे, तितका आमचाही आहे.
Katra: Jammu & Kashmir National Conference leader Farooq Abdullah sings Ram Bhajan. pic.twitter.com/FhHb710R65
— IANS (@ians_india) April 5, 2024
टीकेला आपण घाबरणार नाही
जम्मू-काश्मीरात माध्यमांशी बोलताना फारुख अब्दुला म्हणाले, भगवान रामसंदर्भात माझी श्रद्धा आहे. याबाबत मी केलेल्या वक्तव्यानंतर टीका होईल. परंतु टीकेला घाबरणार नाही. मी एका पाकिस्तानी विद्वानाचे पवित्र कुराणचे भाषांतर वाचले आहे. त्यात त्यांनी रामाबद्दल देखील सांगितले आहे. सर्व लोकांनी बंधुभाव आणि प्रेमाने पुढे जावे, अशी त्यांची इच्छा आहे. मी अनेक वर्षांपासून विविध मंदिरांमध्ये राम भजन गात आहे. यामुळे माझी मतपेटी कमी होईल किंवा ती जाईल, यासंदर्भात मी चिंता करत नाही.