इथे माणसांप्रमाणेच जनावरांनाही दिली जाते रविवारची सुट्टी, अजूनही पाळली जाते 100 वर्षांपूर्वीची परंपरा
माणसांप्रमाणे जनावरांनाही 1 दिवसाची रजा दिली जाते. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही परंपरा त्यांच्या पूर्वजांनी सुरू केली होती. आजही गावातील सर्व कुटुंबीय त्याचे अनुसरण करतात. प्राणी आणि मानव यांचे नाते वर्षानुवर्षे चालत आले आहे, जसे लोक माणसाच्या सुखसोयींची काळजी घेतात, त्याचप्रमाणे जनावरांच्या सुखसोयींचीही इथे काळजी घेतली जाते.
मुंबई: भारत सांस्कृतिक विविधतेसाठी देखील ओळखला जातो. शेकडो वर्षांच्या अनेक अनोख्या परंपरा आजही भारतात आहेत आणि या परंपरा येणाऱ्या पिढ्या पुढेही कायम ठेवत आहेत. अशीच एक अनोखी परंपरा झारखंडच्या लातेहार गावात आहे, जिथे माणसांप्रमाणे जनावरांनाही 1 दिवसाची रजा दिली जाते. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही परंपरा त्यांच्या पूर्वजांनी सुरू केली होती. आजही गावातील सर्व कुटुंबीय त्याचे अनुसरण करतात. प्राणी आणि मानव यांचे नाते वर्षानुवर्षे चालत आले आहे, जसे लोक माणसाच्या सुखसोयींची काळजी घेतात, त्याचप्रमाणे जनावरांच्या सुख सोयींचीही इथे काळजी घेतली जाते, असे लातेहार गावातील लोक मानतात.
रविवारी सुट्टी
झारखंडमधील लातेहार गावात रविवारी सर्व जनावरांना सुट्टी दिली जाते आणि या दिवशी त्यांच्याकडून कोणतेही काम घेतले जात नाही. तिथल्या गावकऱ्यांच्या मते, ज्याप्रमाणे माणसाला विश्रांतीसाठी एक दिवस निश्चित असतो, त्याचप्रमाणे जनावरांनाही विश्रांतीची गरज असते आणि त्यांना आठवड्यातून एकदा विश्रांती द्यायला हवी.
एका बैलाचा मृत्यू झाला होता…
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, सुमारे 10 दशकांपूर्वी शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन जनावरांना कामावर नेले जाईल, पण आठवड्यातून एकदा त्यांना विश्रांती दिली जाईल, असा नियम बनवला. तेव्हापासून आजतागायत गावकऱ्यांकडून जनावरांना सुट्टी देण्याची परंपरा पाळली जात आहे. याशिवाय आजूबाजूच्या हरखा, मोंगार, लालगडी, पाकर या गावांमध्येही हाच ट्रेंड दिसून येत आहे.