नऊवारी साडीत कोरियन तरुणींची फक्कड लावणी पाहून तुम्हालाही लागेल उचकी!
कोरियन डान्स आणि के-पॉप बँड्स यांची जगभरात तुफान क्रेझ असतानाच दक्षिण कोरियाच्या भूमीवर चक्क महाराष्ट्रीयन लावणी सादर करण्यात आली आहे. ही लावणी कोरियन तरुणींनीची नऊवारी साडी नेसून सादर केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सेऊल : 15 डिसेंबर 2023 | कोरियन स्कीनकेअर, कोरियन डान्स, के-ड्रामा, के-पॉप यांनी जगभरात आपली भुरळ पाडली आहे. भारतातही कोरियन ड्रामा आणि के-पॉप बँड्सचे असंख्य चाहते आहेत. दक्षिण कोरियातील ड्रामा आणि गाणी अत्यंत आवडीने इथे पाहिले आणि ऐकले जातात. पण कोरियाच्या भूमीवर मराठमोळी लावणी सादर केल्याची तुम्ही कधी कल्पना केली का? ही कल्पना ऐकायला जितकी सुंदर वाटतेय, तितकीच सुंदर ती पहायलाही वाटतेय. मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना अदिती भागवतने ही कमाल केली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये चक्क कोरियन तरुणींनी नऊवारी साडी नेसून लावणी सादर केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘मला लागली कुणाची उचकी..’ या गाण्यावर कोरियन तरुणींनी लावणी सादर केली आहे. या व्हिडीओची सुरुवात अदिती भागवतच्या दमदार अदाकारीने होते. त्यानंतर तीन कोरियन तरुणी लावणी नृत्य सादर करतात. सेऊलमधील एका ऐतिहासिक राजमहालात हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. कोरियन तरुणींना अप्रतिम लावणी सादर करताना पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
‘कोरियन भूमीवर नऊवारी साडी पाहून खूप छान वाटतंय. तुम्ही खरंच अप्रतिम नृत्य सादर केलंय. खूपच भारी’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘कोरियन तरुणी नऊवारी साडीत अगदी महाराष्ट्रीयन तरुणींसारख्याच दिसत आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘त्या नृत्यांगना कोरियन आहेत असं वाटलंसुद्धा नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 22 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.