‘मी तुमच्यासाठी माझा जीवही देऊ शकते, पण मला जीवंत राहण्याची इच्छा’, महिला खासदाराचं भाषण व्हायरल
सोशल मीडियावर एका महिला खासदाराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत महिला खासदार अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहे. ही महिला अवघ्या 21 वर्षांची आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेला कारण ठरला आहे.
वेलिंग्टन | 5 जानेवारी 2024 : काही नेत्यांची भाषणं ही लक्षात राहतात. कारण ते जितक्या प्रभावीपणे भाषण करतात त्याने आपल्या मनावर खोलवर परिणाम पडतो. नेतेमंडळीच्या भाषणावरुनच अनेकजण त्यांचे चाहते बनतात. हेच चाहते पुढे जावून नेत्यांचे समर्थक, कार्यकर्ते किंवा अनुयायी बनतात. प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात, देशात असे अनेक नेते आहेत ज्यामुळे नागरीक प्रभावित होता. तसेच अशा नेत्यांच्या भाषणाचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका नेत्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. संबंधित व्हिडीओ हा एका महिला खासदाराचा आहे. ही महिला खासदार न्यूजीलंड देशाची आहे. पण तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होतोय. या महिला खासदाराचं नाव हाना-राविती माईपी-क्लार्क असं आहे. ती 21 वर्षांची आहे. ती न्यूजीलंडमधील सर्वात कमी वयाची खासदार आहे.
खरंतर व्हायरल होणारा व्हिडीओ हा 2023 चा आहे. या व्हिडीओला एक्सवर (ट्विटर) @Enezator नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडीओत हाना आपल्या मतदारांना वचन देताना दिसत आहेत. “मी तुमच्या भल्यासाठी माझा जीवही देऊ शकते. पण मला सध्या जीवंत राहण्याची इच्छा आहे आणि आपल्या सर्वांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी काम करत आहे”, असं हाना आपल्या भाषणात बोलते. हाना भाषण देत असताना अनेकवेळा भावूक देखील होते.
हाना आणखी काय म्हणाल्या आहेत?
“मला संसदेत येण्याआधी सल्ला देण्यात आला होता की, मी कोणत्या गोष्टीला वैयक्तिक घेऊ नये. ठिक आहे. मी सभागृहात सांगण्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीला वैयक्तिक घेण्याशिवाय काही करु शकत नाही”, असं हाना आपल्या भाषणात बोलताना दिसत आहेत.
New Zealand natives’ speech in parliament pic.twitter.com/OkmYNm58Ke
— Enez Özen | Enezator (@Enezator) January 4, 2024
हाना ऑक्टोबर 2023 मध्ये हौराकी-वायकाटो जागेवरुन खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचा विजय खास आहे कारण त्यांनी न्यूजीलंडमधील सर्वात ज्येष्ठ आणि सन्मानित खासदारांपैकी एक असलेले नानैया महुता यांचा पराभव केला होता. हाना या माओरी समाजाच्या आहेत. खासदार म्हणून निवडून येताच हाना यांनी समाजाच्या अधिकांसाठी संसदेत आवाज उठवला आहे.