तुम्ही कधी पाहिलीये का 551 फूट राखी? 600 बहिणींनी मिळून भावाला दिलं अनोखं सरप्राईज!
या नात्यात किती प्रेम दाखवू तितकं कमी असतं नाही का? असाच एक किस्सा व्हायरल झालाय. ही घटना आहे मध्य प्रदेशातील बैतूलमधील. इथे बहिणींनी चक्क 551 फूट लांबीची राखी तयार केलीये. आहेना वाढीव?
मुंबई: रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीचं प्रेम! रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला ते गाणं आठवतं, “फुलों का तारो का सबका का कहना है, एक हजारो में मेरी बहना है”. हा सण म्हणजे भावाने बहिणीवर आणि बहिणीने भावावर प्रेम व्यक्त करायचा दिवस. प्रेम व्यक्त करायला बहिणी सुद्धा वेगवेगळ्या पध्दतीने प्रेम व्यक्त करतात. आधी फक्त भाऊ बहिणीला गिफ्ट द्यायचा, आताच्या काळात तर बहीण सुद्धा आपल्या भावाला चांगले गिफ्ट्स देते. दोन्हीकडून चांगला खर्च होतो.
केंदू बाबा
मध्य प्रदेशातील बैतूलमधील एका भावाला शेकडो बहिणी आहेत. या सर्व बहिणी त्याला नेहमी राखी बांधतात पण यावेळी त्यांनी त्यांच्या भावाला सरप्राइज दिलंय. त्यांनी आपल्या भावासाठी 551 फुटाची राखी तयार केलीये. ही राखी एकूण 600 बहिणींनी मिळून तयार केलीये. ही गोष्ट आहे मध्य प्रदेशमधील फेमस असणाऱ्या केंदू बाबांची. हे केंदू बाबा पान व्यवसाय करतात. या पानाचे खूप लोकं फॅन आहेत. केंदू बाबा म्हणजेच राजेंद्र सिंह चौहान जे माजी नगरसेवक आहेत.
राजकारणासोबतच समाजसेवेचं सुद्धा वेड
राजेंद्र सिंह चौहान यांना राजकारणासोबतच समाजसेवेचं सुद्धा वेड आहे. ते नेहमीच महिलांच्या हक्कासाठी लढतात. ते महिलांना सरकारी योजनांबद्दल जागरूक करतात, त्यांना न्याय देण्यासाठी लढतात. महिलांसाठीचं त्यांचं कार्य मोठं आहे त्यामुळे अनेक स्त्रिया त्यांना सख्ख्या भावासारखं मानतात. दरवर्षी या शेकडो महिला त्यांना राखी बांधतात यावर्षी या महिलांची स्टाइल जरा वेगळी होती.
551 फूट लांबीची राखी
एकूण 600 महिलांनी 551 फूट लांबीची राखी तयार केली. सगळ्यांनी प्रत्येकी एक एक राखी गोळा करून ही मोठी राखी महिनाभरात तयार केली. ही राखी त्यांनी राजेंद्र सिंह चौहान यांना बांधली. त्यानंतर राजेंद्र यांनी बहिणींना भेटवस्तू दिधली आणि जेवण सुद्धा दिले. हा कार्यक्रम राधा कृष्ण धर्मशाळेत होता. या बहिणींबद्दल बोलताना राजेंद्र म्हणतात, हे कार्यक्रम 1999 मध्ये सुरु झाले याआधी मी घरीच बहिणीकडून राखी बांधून घ्यायचो. या 600 पैकी एक असलेल्या उषा मंडल या बहिणीचं देखील असं म्हणणं आहे की, राजेंद्र सिंह हे भावापेक्षा बढकर आहेत आणि त्यांच्या हक्काच्या लढ्यात सुद्धा ते साथ देतात.