देशातील ‘या’ गावात होत नाहीये तरुणांचं लग्न, मुलगी देण्यास नकार! कारण वाचून थक्क व्हाल…
अनेकदा लोकांची लग्नं न होण्याची अनेक कारणं असतात. पण कल्पना करा घरातल्या माश्यांमुळे जर कोणी लग्न करत नसेल तर? होय समजा तुमच्या घरात खूप माश्या आहेत आणि याच कारणाने तुमचं लग्न होत नसेल तर? आश्चर्यचकित करणारं आहे नाही का?

उन्नाव: लग्न ही कोणाच्याही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते. अनेकदा लोकांची लग्नं न होण्याची अनेक कारणं असतात. पण कल्पना करा घरातल्या माश्यांमुळे जर कोणी लग्न करत नसेल तर? होय समजा तुमच्या घरात खूप माश्या आहेत आणि याच कारणाने तुमचं लग्न होत नसेल तर? आश्चर्यचकित करणारं आहे नाही का? ही घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील नवाबगंज ब्लॉकमधील रुडवार नावाच्या गावात हा प्रकार घडत आहे.
इथं माश्यांची इतकी दहशत आहे की इथल्या प्रत्येक घरात, सगळीकडे माश्या आहेत. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूवर माश्या चिकटतात, अशी स्थिती आहे. इतकंच नाही तर पावसाळ्यात इथली परिस्थिती अधिकच बिकट होते. गावाचा एकही कोपरा असा नाही जिथे माश्या बसत नाहीत.
माश्या अन्नपदार्थांवरही बसतात, ज्यामुळे लोक नीट खाऊ शकत नाहीत किंवा झोपू शकत नाहीत. शिवाय या गावात कुठल्याही बापाला आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नाही. एका रिपोर्टनुसार, स्थानिक महिलांनी सांगितले की, आता गावातील लोक संबंध ठेवण्यासही तयार नाहीत. ज्यांचे लग्न झाले आहे ते इथे राहायला तयार नाहीत. माश्यांमुळे इथे नातेवाईक येण्यास सुद्धा टाळाटाळ करीत आहेत.
याची मुख्य कारणे शोधली असता अलीकडच्या काळात पोल्ट्री फार्मचा व्यवसाय हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. लोकांनी पोल्ट्री फार्म सुरू केलं आहे, ज्यामुळे त्यांना खूप नफा मिळतो. नफ्यासाठी सर्वत्र पोल्ट्री फार्म सुरू होत आहेत. पोल्ट्री फार्ममध्ये मरणाऱ्या कोंबड्या जमिनीत न पुरता उघड्यावर फेकल्या जातायत. त्यामुळे परिसरात घाण पसरत आहे.
सध्या जिल्हा प्रशासनही या प्रकरणात हतबल दिसत आहे. पूर्वी गावात कुक्कुटपालन करणारे लोक औषध फवारणी करत असत, ज्यामुळे माश्या कमी होत असत, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांनी हे करणे बंद केले असून यामुळे माश्यांची संख्या वाढली आहे. या सगळ्यामुळे इथे राहणाऱ्यांना लग्न जुळवण्यात अडचण येत आहे.