Reliance General Insurance : आरोग्य विमा क्षेत्रात रिलायन्सची लवकरच ‘एंट्री’! पसंतीनुसार ग्राहकांना पॉलिसी फीचर्स निवडीचे स्वातंत्र्य
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आरोग्य क्षेत्रात पदार्पण करण्याची घोषणा केली आहे. या आरोग्य विमा योजनेचे नाव रिलायन्स हेल्थ गेन असे आहे.
मुंबई : आरोग्य विमा क्षेत्रात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (Reliance General Insurance) दमदार एंट्रीसाठी तयार झाली आहे. रिलायन्स हेल्थ गेन (Reliance Health Gain) नावाने कंपनी आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या आरोग्य विमा योजनेत ग्राहकांना त्यांच्या पसंती आणि गरजेनुसार, फिचर्स निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ग्राहकांना आवश्यक तेवढ्याच फिचर्सची (Feature) विमा पॉलिसी तयार करुन ते निवडू शकतात. विशेष म्हणजे ज्या सेवा त्यांनी या फिचर्ससाठी निवडलेल्या आहेत, त्यासाठीच त्यांना रक्कम अदा करावी लागेल, संपूर्ण विमा योजनेसाठी दाम खर्च करण्याची गरज नाही. रिलायन्स हेल्थ गेन विमा योजनेचे मुख्य फिचर्स म्हणजे यामध्ये ग्राहकांना दुप्पट संरक्षण (Double Coverage) देण्याचा दावा कंपनीने केला आहे. याचा अर्थ दावा दाखल करताना विमा रक्कमेचे दुप्पट संरक्षण मिळते.
याव्यतिरिक्त विमा योजनेच्या एकूण मूळ विमा रक्कमेला (Base sum amount) विमा मुदत काळात कितीवेळा पण कायम ठेवता (Restore) येते. तसेच या विमा योजनेत खात्रीलायक बोनस ही मिळते. विमा योजनेत पूर्वीच निदान झालेल्या आजारांचा प्रतिक्षा कालावधी तीन वर्षांहून कमी करत एक ते दोन वर्षे करण्याचा विकल्प निवडीचा ही पर्याय उपलब्ध आहे.
विमा राशी किती
18 ते 65 वर्षांमधील ग्राहकांसाठी तीन लाख ते एक कोटी रुपयांच्या दरम्यानचा संरक्षण रक्कमेचा विमा, फिचर्ससह खरेदी करण्याचा पर्याय आहे. याव्यतिरिक्त तीन लाख रुपयांपर्यंतच्या विमा पॉलिसीसाठी कोणतीही वयोमर्यादा घालून देण्यात आलेली नाही. जे वयाच्या बंधनामुळे विमा योजनेपासून वंचित राहतात, अशा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा थेट फायदा होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
एका वेळी 12 जणांना मिळेल संरक्षण
या विमा योजनेचा एक खास वैशिष्ट्ये म्हणजे ही योजना संयुक्त कुटुंबासाठी खूपच फायदेशीर ठरु शकते. कारण या विमा योजनेतंर्गत तब्बल 12 लोकांना एकाच योजनेतून संरक्षण प्राप्त करता येईल. 12 सदस्यांकरीता ग्राहकाला विमा संरक्षण घेता येईल. रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन यांनी सांगितले की, कोरोना सारख्या महामारीनंतर आरोग्य विमा संरक्षणाबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरुकता आली आहे. अत्याधुनिक उपचार पद्धती आणि त्यासाठीचा वाढता खर्च लक्षात घेता, ग्राहकांना योग्य आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे कठिण झाले आहे. त्याचाच ग्राहक सध्या सामना करत आहेत. परंतू, रिलायन्स हेल्थ गेन पॉलिसीमध्ये ग्राहकांना त्यांच्या सोयी, गरजेनुसार फिचर्स निवडीचा पर्याय देण्यात आल्याने, त्यांच्या समस्या कमी होतील आणि त्यांना त्यांच्या मर्जीनुसार, पॉलिसी डिझाइन करता येणार आहे.