EPFO Interest : ‘व्याज सोडा, पैसा तरी सुरक्षित आहे का?’ युझर्सच्या जहरी सवालावर असे दिले EPFO नं उत्तर
EPFO Interest : पीएफ वरील व्याजची रक्कम कधी जमा होईल, यावरुन विविध सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली आहे. काही युझर्सनी तर केंद्र सरकारच्या धोरणाचा तिखट समाचार घेतला. त्यावर ईपीएफओने असे उत्तर दिले.
नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याजदरात ( PF Interest) वाढीचा निर्णय घेतला आहे. पण व्याजाची रक्कम अद्यापही खात्यात जमा झालेला नाही. त्यावरुन आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. त्यावरुन अनेक युझर्सनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तर काहींनी व्याजाची रक्कम सोडा देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा पीएफमधील मुळ पैसा तरी सुरक्षित आहे का असा जहरी सवाल केला. ईपीएफओने याप्रकरणात उत्तर दिलं आहे.
व्याजदर किंचित वाढला
ईपीएफओने (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.15 टक्के व्याज दर घोषीत केला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकतीच त्याला मंजूरी दिली. एक परिपत्रक काढून ईपीएफओने त्याची माहिती दिली. या महिन्यातच व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तक्रारींचा पाऊस
प्रतिक्षेत असलेली व्याजाची रक्कम न मिळाल्याने अनेक खातेदारांनी त्याविरोधात तक्रार केली आहे. काही युझर्सनी व्याजाची रक्कम कधी मिळेल, असा सवाल विचारला आहे. त्यानुसार, त्यांच्या खात्यात अद्याप गेल्या आर्थिक वर्षांतील व्याजाची रक्कम अद्याप जमा झालेला नाही. काहींनी व्याजाची रक्कम सोडा देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा पीएफमधील मुळ पैसा तरी सुरक्षित आहे का असा जहरी सवाल केला.
काय दिले ईपीएफओने उत्तर
व्याजाची रक्कम खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. खातेदारांना चिंता करु नये. त्यांनी संयम ठेवावा. त्यांच्या व्याजाची रक्कम खात्यात जमा होईल, त्यांनी निश्चिंत राहावे, असा आवाहन ईपीएफओने ट्विटर द्वारे दिले आहे.
Int on PF for fy 2022-2023 still not credited , not sure whether money also is safe or not @socialepfo
— suleman Khan (@sulemankhan838) August 4, 2023
The process is in pipeline and may be shown there very shortly. Whenever the interest will be credited, it will be accumulated and paid in full. There would be no loss of interest. Please maintain patience
— EPFO (@socialepfo) August 4, 2023
या तीन पद्धतीने तपासा बॅलन्स
अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.
उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स
स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.
मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या
तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.
एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम
पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.