Share Market Updates: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत आहे. सेन्सेक्सच्या टॉप-30 पैकी 22 शेअर्स तेजीत असून त्यामध्ये महिंद्रा ॲंड महिंद्रा, एल ॲंड टी, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीच्या शेअर्सचा समावेश आहे.
आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची (Share market updates) सुरुवात तेजीने झाली आहे. आज सकाळी सेन्सेक्स (Sensex) 398 अंकांनी वधारून 54576 वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) 140 अंकांच्या वाढीसह 16273 या स्तरावर उघडला. सकाळी सेन्सेक्सच्या टॉप-30 पैकी 22 शेअर्स तेजीत असून 8 शेअर्स घसरले. महिंद्रा ॲंड महिंद्रा, एल ॲंड टी, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. तर एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि इंटसइंड बँकेच्या शेअर्सचे भाव घसरताना दिसत आहे. दरम्यान आज (शुक्रवार) सकाळी रुपयाच्या मूल्यातही घसरण होत असून रुपयावरील दबाव कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 12 पैशांनी घसरून 79.25 वर झाले आहे. गुरूवारी रुपया 79.18 या स्तरावर बंद झाला होता.
आजपासून जून तिमाहीचा लेखाजोखा सादर केला जाणार आहे. आज टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा लेखाजोखा जाहीर करणार आहे. जून तिमाहीत कंपनीच्या महसूलात वार्षिक सरासरीच्या 15 टक्के वाढ होईल. तसेच नफ्यात 7-11 टक्के वाढ होऊ शकते, असा बाजाराचा अंदाज आहे.
IT कंपन्यांच्या कमाईवर होणार परिणाम
क्रिसिल या रेटिंग एजन्सीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात आयटी सेक्टरमधील कंपन्यांच्या महसूलात12-13 टक्क्यांपर्यंत घट होण्याचे अनुमान आहे. 2021-22 साली तो आकडा 19 टक्के होता.
हे शेअर खरेदी करा
दरम्यान MoSL या रेटिंग एजन्सीने आयसीआयसीआय लोम्बार्डचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे . त्यासाठी 1500 रुपये टार्गेट प्राईस ठेवली आहे. सध्या या शेअरची किंमत 1280 रुपये आहे. नोमुराने ल्युपिनचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 1098 रुपये आहे. सध्या या शेअरचे भाव 635 रुपये आहेत.
गुरुवारी शेअर बाजारात तेजी
याआधी म्हणजे काल, गुरुवारी शेअर बाजारात तेजी होती. भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी होती. दिवसाच्या अखेरीस 30 शेअरवरील आधारीत बीएसई सेन्सेक्स 427.49 अंकाने वाढून 54,178.46 अंकावर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 143.10 अंकावरून 16,132.90 अंकावर बंद झाला. सेंसेक्सच्या शेअरमध्ये टायटनच्या शेअरमध्ये सर्वाधिक 5.69 टक्क्याने वाढ झाली.