‘सलमान खानने माझी फसवणूक केली’, व्यापाऱ्याची पोलिसात तक्रार, पोलिसांकडून समन्स जारी
व्यापारी अरुण गुप्ता यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सलमान खान, अलवीरा खान यांच्यासह आणखी काही संबंधितांना समन्स पाठवले आहेत (Chandigarh police summons Salman Khan and his sister Alvira Khan).

चंदिगड : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, त्याची बहीण अलवीरा खान आणि त्याची सामाजिक संस्था असलेल्या बीईंग ह्यूमनच्या अधिकाऱ्यांवर एका चंदिगडच्या व्यापाऱ्याने फसवणुकीचा आरोप केला आहे. सलमान खान, त्याची बहीण आणि बीईंग ह्यूमन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्याला कोट्यवधी रुपये खर्च करुन शोरुम उभं करायला लावलं. मात्र, त्यानंतर दिल्लीतून सामान पाठवलं जात नसल्याचा दावा व्यापाऱ्याने केला आहे. तसेच कंपनीची वेबसाईटही बंद आहे. त्यामुळे हतबल झालेल्या व्यापाऱ्याने अखेर पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यांनी सलमान खान, अलवीरा खान तसेच बीईंग ह्यूमनचे सीईओ प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनूप, संजय रंगा, मानव, आलोक यांना समन्स बजावले आहेत (Chandigarh police summons Salman Khan and his sister Alvira Khan).
व्यापाऱ्याची तक्रार नेमकी काय?
संबंधित व्यापाऱ्याचं नाव अरुण गुप्ता असं आहे. सलमान खानच्या सांगण्यानुसार आपण मनीमाजरा येथील एनएसी परिसरात 3 कोटींचं मोठं बीईंग ह्यूमन ज्वेलरीचं मोठं शोरुम उभारलं होतं. त्यासाठी स्टाईल क्विंटेट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड सोबत करारही करण्यात आला होता. त्यानंतर शोरुम तर सुरु झालं. मात्र, कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. बीईंग ह्यूमनची ज्वेलरी ज्या स्टोअरमधून देण्यात येणार होतं ते बंद पडलं आहे. त्यामुळे सामानच मिळत नाहीय, अशी तक्रार व्यापारी अरुण गुप्ता यांनी पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांकडून समन्स जारी
व्यापारी अरुण गुप्ता यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सलमान खान, अलवीरा खान यांच्यासह आणखी काही संबंधितांना समन्स पाठवले आहेत. तसेच पुढच्या दहा दिवसात याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत (Chandigarh police summons Salman Khan and his sister Alvira Khan).
व्यापाऱ्याने पोलिसांना व्हिडीओही पुरावा म्हणून दिला
“सलमान खानने मला बिग बॉसच्या सेटवर बोलावलं होतं. तसेच कंपनी सुरु झाल्यानंतर सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. सलमान खानने चंदिगडमध्ये शोरुम सुरु केल्याचंही म्हटलं होतं. विशेष म्हणजे सलमानने शोरुमच्या उद्घाटनाला येणार असं आश्वासन दिलं होतं. पण कामात व्यस्त असल्याने येऊ न शकल्याचं कारण दिलं”, असं अरुण गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं. व्यापाऱ्याने या संबंधित व्हिडीओ देखील पोलिसांना पाठवला आहे. याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा :
डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल
