Cruise Drugs Party | ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, NCB अधिकाऱ्यांनी आर्यनला काय विचारलं? वकिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठही आरोपींना किला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी कोर्टाने त्यांना 7 ऑक्टोबर म्हणजेच आजपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत आज संपली.
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठही आरोपींना किला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी कोर्टाने त्यांना 7 ऑक्टोबर म्हणजेच आजपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत आज संपली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा किला कोर्टात दाखल करण्यात आलं. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी 11 ऑक्टोबरपर्यंत आरोपींची कोठडी मागितली. कोर्टात जवळपास साडेतीन ते चार तास युक्तीवाद चालला. या दरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टात युक्तीवादादरम्यान आर्यनच्या वकिलांनी कोर्टात ड्रग्ज पार्टीच्या रात्री नेमकं काय झालं, एनसीबी अधिकाऱ्यांनी काय-काय विचारलं ती सर्व माहिती दिली.
किला कोर्टात आर्यनचे वकील सतीश माने-शिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली. यावेळी आर्यनसोबत घडलेला सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला. आर्यनने नेमकं काय-काय सांगितलं तीच माहिती सतीश यांनी कोर्टात मांडली. “मी क्रूज टर्मिनल पोहोचलो तेव्हा तिथे अरबाजही होता. मी त्याला ओळखत होतो त्यामुळे आम्ही दोघं शिपच्या दिशेला निघालो. मी तिथे पोहोचताच त्या लोकांनी मला सोबत ड्रग्ज बाळगलं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर मी नाही असं उत्तर दिलं. त्यांनी माझ्या बॅगेची झडती घेतली. त्यानंतर माझी झडती घेतली. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी माझा फोन घेतला. त्यानंतर ते मला एनसीबी ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्यानंतर रात्री दीड-दोन वाजेपर्यंत वकिलांना भेटण्याची अनुमती दिली गेली. एनसीबीने माझ्या फोनने सर्वकाही डाऊनलोड केलं. त्यानंतर त्याच बेसिसवर माझी चौकशी करायला सुरुवात केली. खरंतर मला त्या रात्रीबद्दल काहीच तक्रार नाही”, अशा शब्दात आर्यनने भूमिका मांडल्याची माहिती वकील सतीश माने-शिंदे यांनी दिली.
पार्टीत सहभागी होण्याचं निमंत्रण कसं मिळालं?
“माझा एक प्रतिक नावाचा मित्र आहे. त्याने मला फोनवर सांगितलं होतं की अशा पार्टीसाठी वीवीआयपीच्या रुपात निमंत्रण येईल म्हणून. प्रतीक गाबा हा फर्नीचरवालासोबत संपर्कात होता. फर्नीरवलाला ती व्यक्ती आहे जी व्यक्ती आयोजकांच्या कायम संपर्कात होती. पार्टीत मी ग्लॅमर तडाका टाकावा याच निमित्ताने कदाचित मला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं असेल”, अशी भूमिका आर्यनची असल्याचं वकिलांनी सांगितलं.
“मला असं म्हणायचं नाही की अरबाज माझा मित्र नाही. पण त्याच्या कोणत्याही हालचालींची मला खरंच कल्पना नव्हती. प्रतीक देखील अरबाजचा मित्र आहे. पण माझी काहीच तक्रार नाही. माझा कोणत्याही आरोपीसोबत संपर्क नाही”, अशीही भूमिका वकिलांनी कोर्टात सांगितली.
‘चौकशी होत नाही, मग कस्टडीची गरज काय?’
“अचित हा एकमेव व्यक्ती आहे ज्याचं कन्फ्रंटेशन व्हायला हवं. माझे सगळे चॅट कस्टडीतले आहेत. मी त्यांच्यासोबत छेडछाड करु शकत नाही. फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे सर्व गोष्टी पाठवल्या गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनसीबीने आर्यनची चौकशी केलेली नाही. कदाचित ते इतर आरोपींची चौकशी करण्यात व्यस्त असतील. पण आर्यनची खरंच दरदिवशी कस्टडीत राहण्याची गरज आहे? कारण तुम्ही एखाद्याला अटक केली म्हणजे तो खरंच आरोपी झाला, असा होत नाही. जर तो आरोपी असता तर त्याने आतापर्यंत कदाचित सर्व गुन्हा कबूल केला असता. त्याच्याकडून काहितरी मिळालं असतं. 100 ऑफिसर आहेत फक्त कन्फ्रंटेशनसाठी कुणाला रिमांडवर घेतलं जाऊ शकत नाही. गेल्या सात दिवासांत यांना काहीच मिळालं नाही. याचा अर्थ काही आहेच नाही. चौकशी होत तर नाही आहे. मग कस्टडीची काय गरज?”, असा प्रश्न वकील सतीश माने-शिंदे यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या :
शाहरुख खानला मोठा धक्का, आर्यन खानला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, इतरांचाही समावेश
आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश