प्रेयसीने त्याच्यासाठी घर विकलं, पैसे दिले, पण प्रियकराने तिच्या तीनही लेकरांसह तिला संपवलं, युपीतल्या चार हत्यांचं ठाणे कनेक्शन
प्रेमासाठी आपण जोडीदाराला आपलं सर्वस्व द्यायला तयार असतो. पण प्रेम करण्याआधी समोरची व्यक्ती आपली फसवणूक तर करत नाहीय ना याची शहानिशा जरुर करावी. कारण काही लोक आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात.
ठाणे : प्रेमासाठी आपण जोडीदाराला आपलं सर्वस्व द्यायला तयार असतो. पण प्रेम करण्याआधी समोरची व्यक्ती आपली फसवणूक तर करत नाहीय ना याची शहानिशा जरुर करावी. कारण काही लोक आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. आपला कामापुरता वापर करुन घेतात. आपल्याला भावनांमध्ये गुंतवून नको ते आश्वासन देतात. आपण त्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये मदत करतो. आपण समोरच्या व्यक्तीसाठी सगळं काही करतो. पण जेव्हा आपल्यासाठी करण्याची वेळ येते तेव्हा समोरची व्यक्ती कमिटमेंट तोडते. आपल्याकडे पाठ फिरवते आणि आपल्या आयुष्यातून निघून जाते. आपण सहजासहज साथ नाही सोडली तर ती व्यक्ती आपला जीव घेण्यासही मागेपुढे बघत नाही. अशीच काहिशी घटना उत्तर प्रदेशात घडलीय. खरंतर संबंधित प्रकरणातील महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या उत्तर प्रदेशात झालीय. पण ती मुळची ठाणेकर होती. ती मुब्र्यात वास्तव्यास होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात 11 सप्टेंबरला एका 35 वर्षीय महिलेसह तिच्या तीन मुलांचा मृतदेह आढळतो. एकाच वेळी चार मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडते. हे मृतदेह नेमके कुणाचे याचा सुरुवातीला काहीच थांगपत्ता लागत नाही. पोलिसांवरही दबाव वाढत जातो. अखेर पोलीस तपासाचे चक्र फिरवतात आणि खरे आरोपी गजाआड होतात. विशेष म्हणजे या तपासात जी माहिती समोर येते त्याने पोलीसही चक्रावतात. कारण उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात घडलेल्या हत्येच्या घटनेला ठाण्याचं कनेक्शन असल्याचं समोर येतं. पोलीस आरोपीला बेड्या ठोकतात आणि सर्वच घटना उलगडते.
मृतक नेमकी कोण?
पोलिसांनी केलेल्या तपासात मृतक 35 वर्षीय महिलेचं नाव मेरी कत्रायन असं असल्याचं समोर येतं. ही महिला मुंब्र्यात एका दुकानात काम करायची. तिच्यासोबत ननूक उर्फ मुबारक अली हा देखील तिथेच काम करायचा. खरंतर ननूक हा विवाहित होता. तरीही त्याचे मेरीसोबत प्रेमसंबंध होते. मेरीचं वर्षभरापूर्वी तिच्या पतीसोबत भांडण होऊन ती वेगळी झाली होती. त्यानंतर मेरी आणि ननूक यांच्यात संबंध होते. मेरी हिने आपलं घर विकलं होतं. त्याचे पैसे तिने ननूककडे दिले होते. तसेच ती ननूककडे वारंवार लग्न करण्याची विनंती करत होती. पण ननकूचं आधीच एक लग्न झालेलं होतं. त्यामुळे तो मेरीच्या लग्नाच्या मागणीकडे दुर्लक्ष करायचा. पण मेरी हट्टालाच पेटली होती. त्यामुळे ननूक याने मेरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं.
आरोपीने चौघांची हत्या केली
मेरीची लग्नाची मागणी कायमची बंद करण्यासाठी ननूकने एक कट आखला. तो गोड बोलून मेरी आणि तिच्या तीनही मुलांना उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने मेरी आणि तिच्या तीनही मुलींची हत्या केली. ते 9 सप्टेंबरला मुंबईतून उत्तर प्रदेशला निघाले. 10 सप्टेंबरला ते तिथे पोहोचले. तिथे ननूकने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने मेरी आणि तिच्या मुलांची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते लखनऊहून मुंबईच्या दिशेला निघाले.
पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?
उत्तर प्रदेश पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. पोलिसांना जसजसे पुरावे मिळत गेले तसतसे ते आरोपींच्या जवळ येत गेले. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथकच मुंबईत दाखल झाले. त्यांनी मेरीची माहिती काढली. त्यांनंतर ते ठाण्यातील मुंब्रा इथे गेले. त्यांनी चौकशी करत आरोपी ननूकला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याचा जबाब नोंदवला. यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्यासह आणखी दोघांच्या बेड्या ठोकल्या.
हेही वाचा :
राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच, दोघेही परदेशात असल्याने अटक नाही
लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार