साकीनाका बलात्कार प्रकरण, पीडितेच्या कुटुंबियांची सरकारी वकील बदलण्याची मागणी, कोण हवं तेही सांगितलं, भीम आर्मीही आक्रमक
साकीनाका भागातील खैरानी रोडवर घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नेमेलेले अॅड. राजा ठाकरे यांना बदलण्यात यावे, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.
मुंबई : साकीनाका भागातील खैरानी रोडवर घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नेमेलेले अॅड. राजा ठाकरे यांना बदलण्यात यावे, अशी मागणी पीडितेच्या आईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज (15 सप्टेंबर) पत्र पाठवून केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या साकीनाका परिसरात 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री निर्भयावर आरोपी मोहन चौहान याने क्रूर अत्याचार केले होते. पीडितेच्या मृत्यूनंतर या गुन्ह्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. या प्रकरणी कलम 509, 302, 376 तसेच 377 अन्वये गुन्हा नोंदवला. मात्र पीडिता विशेष समाजाची असल्याचे समजल्यावर सदर गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 तसेच सुधारणा कायदा 2015 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि पोलिसांना पुरावे जमा करण्यात मदत व्हावी यासाठी घाईघाईन अॅड. राजा ठाकरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सरकारी वकिलाच्या नियुक्तीवर पीडितेच्या आईचा आक्षेप
सरकारी वकिलाच्या नियुक्तीवर पीडितेच्या आईने आक्षेप घेतला आहे. अॅड. राजा ठाकरे यांच्या जागी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक संदर्भातले खटले चालवण्याचा अनुभव असणारे वकील अॅड. नितीन सातपुते यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी पीडितेच्या आईने आपल्या पत्रात केली आहे.
भीम आर्मीचं देखील मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, या प्रकरणी भीम आर्मीने देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सरकारी वकील बदल करण्याची मागणी केली आहे. दोन वर्षापूर्वी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अॅट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. राजा ठाकरे यांनी काम पाहिले होते. अॅड. ठाकरे यांच्या हलगर्जीपणामुळे तडवी यांच्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरांना जामीन मिळाला होता, असा आरोप भीम आर्मी या संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका गुन्हेगारास अटक केली आहे. मात्र यामध्ये आणखी एक आरोपी असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीम आर्मीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण
मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने 22 मे 2019 रोजी आत्महत्या केली. पायलने तिच्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता. या छळाला कंटाळून पायलने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्डनं निलंबित केलं होत.
हेही वाचा :