ज्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलं, त्यांच्याकडेच लाच मागितली, नाशकात दोन क्लर्क एसीबीच्या जाळ्यात
नाशिकमधील एका महिला शिक्षण अधिकाऱ्याने लाच घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक तशीच बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील आहे.
नाशिक : नाशिकमधील एका महिला शिक्षण अधिकाऱ्याने लाच घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक तशीच बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात आयुष्यभर काम केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याकडूनच दोन लिपिकांनी लाच मागितल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या दोनही लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात एसीबीच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार निवृत्त कर्मचारी हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यांना पेन्शन, सेवापुस्तक पडताळणी आणि रजेतील फरकांचे बिल यासह अनेक कामं करायची होती. पण कार्यालयातील कार्यरत कर्मचारी काहीना काही कारण देत त्यांना परत पाठवत असत. अनेक दिवस कार्यालयाच्या पायऱ्या चढूनही काम न झाल्याने तक्रारदार चिंताग्रस्त झाले होते. या दरम्यान कार्यालयातील मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या इसमांनी त्यांचं काम करण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार लिपिकांसमोर काही म्हणाले नाही. पण त्यांना खूप संताप आला होता.
निवृत्त कर्मचाऱ्याची एसीबीकडे तक्रार
निवृत्त कर्मचाऱ्याने लिपिकांच्या लाचेबद्दल विचार केला. त्यानंतर त्याने अशा लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, असा विचार केला. त्यामुळे त्याने एसीबी कार्यालयात जावून अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. एसीबीने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं. त्यांनी निवृत्त कर्मचाऱ्याला कार्यालयात जावून संबंधित लिपिकांना लाच देण्यास सांगितलं. तसेच त्याचवेळी एसीबी अधिकारी हे सापळा रचतील, असा निर्णय झाला.
एसीबी अधिकाऱ्याने आरोपींना बेड्या ठोकल्या
एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर निवृत्त कर्मचारी कार्यालयात गेला. त्याने मुख्य लिपिक प्रवीण पिंगळे आणि वरिष्ठ लिपिक शांतराम लहाने यांना दहा हजारांची लाच दिली. याचवेळी एसीबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही लिपिकांना अटक केली.
वसईत सेवा निवृत्त ग्रंथपालला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
दरम्यान, वसईतही अशीच घटना समोर आली आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी सेवा निवृत्त ग्रंथपालला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. वसईच्या उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातून सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली होती. गंगाराम जयराम जाधव (वय 70) असे रंगेहाथ अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. अँटी करप्शन ब्युरो ठाणे आणि कॅम्प पालघरच्या युनिटने ही कारवाई केली.
हेही वाचा :
100 महिला-मुलींना लग्नासाठी गंडवणारा अटकेत, पिंपरी चिंचवडच्या लखोबा लोखंडेचे चक्रावून टाकणारे प्रताप