अतिवृष्टीमुळे डोळ्यांदेखत शेती उद्ध्वस्त, सारं वाहून गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, शेतकरी महिलेचं टोकाचं पाऊल
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस पडला. त्याचा फटका राज्यातील बळीराजांना बसला. अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. अनेकांची शेती वाहून गेली. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड (नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. त्याचा फटका राज्यातील बळीराजांना बसला. अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. अनेकांची शेती वाहून गेली. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. याशिवाय वातावरण बदलांमुळे पिकांना कीड लागल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे भाजीपाला कवडीमोल भावात विकला जातोय. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज घेतलेलं आहे. या सर्व गोष्टींमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याच हावलदिलतेतून नाशिक जिल्ह्यात एका शेतकरी महिलेने आत्महत्या करुन स्वत:ला संपविण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे.
नेमकं काय घडलं?
डोक्यावर कर्जाचे ओझे, अतिवृष्टीमुळे शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल होऊन शेतकरी महिलेने विष घेऊन स्वत:ला संपविल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे. संबंधित घटना ही नांदगावच्या न्यायडोंगरी येथे घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं आवाहन केलं आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडल्यामुळे नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांसह शेती वाहून गेली
तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह शेती वाहून गेली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी महिलेने विष घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मंदाबाई काकळीज असे आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेचे नाव आहे. काकळीज कुटुंबीयांकडे 14 एकर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी मका, कांदे, कापूस, तूर असे वेगवेगळे पीके लावली होती. त्यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते.
डोळ्यांदेखत शेती उद्धवस्त, महिलेचं टोकाचं पाऊल
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यात सलग दोन दिवस ढगफुटी सारखा पाऊस झाला. त्यामुळे सर्वच नदी-नाले ओढ्यांना पूर आले. पुराच्या पाण्यात पिकासह शेती वाहून गेली. डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून मंदाबाईने धास्ती घेतली आणि सकाळी घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधून तिने विष घेऊन स्वत:चे आयुष्य संपविले.
कृषीमंत्री नेमकं काय म्हणाले?
सध्या शेतकऱ्यावर एका मागून एक नैसर्गिक संकट येत आहे. मात्र शेतकऱ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. सरकार तुमच्या पाठीशी असून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व मदत नक्की करु, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.
राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, पण नाशिकमध्ये शेतकरी महिलेची आत्महत्या
राज्यभरात आज गणेशोत्सवामुळे आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. घराघरांमध्ये बाप्पाचं आगमन झालं आहे. पण दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याने तिने हे पाऊल उचललं. राज्यभरात गणेशोत्सव साजरी होत असताना एका शेतकरी घरात महिलेने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याने संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
बाप्पाच्या आगमनादिवशीही प्रेमाचा खूनी खेळ, आणि त्यानं बघता बघता तिच्यासमोर डोक्यात गोळी घातली
धक्कादायक! डीएसपीची महिला कॉन्सटेबलसोबत अंघोळ, व्हिडीओत अश्लिल चाळे, तेही सहा वर्षाच्या मुलासमोर