VIDEO : भरधाव पिकअप बॅरिकेट्स तोडून थेट दुकानात शिरली, एकाचा मृत्यू, दुकानाचं प्रचंड नुकसान
मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या पूजेच्या दुकानात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने पिकअप बॅरिकेट्स तोडून सरळ दुकानात घुसली.
इगतपुरी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या पूजेच्या दुकानात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने पिकअप बॅरिकेट्स तोडून सरळ दुकानात घुसली. अपघात एवढा तीव्र होता की जोरदार आवाज झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतक व्यक्तीचं नाव बबली सिंग असं आहे. ते इगतपुरी येथील तळेगावचा रहिवासी आहेत. बबली या अपघातात गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
सुदैवाने दुकानदारांची 3 मुले बचावली
या अपघातात गरीब दुकानदाराचे खुप नुकसान झाले आहे. या दरम्यान नशीब बलवत्तर म्हणून दुकानदारांची 3 मुले बाहेर खेळत असल्यामुळे बचावली. कालच दसरा झाल्याने आज दर्शनासाठी गर्दी नव्हती. गर्दी असली असती तर मोठा अपघात झाला असता. यात दोन जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले होते. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तीन जखमींवर उपचार सुरु
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे घटनास्थळे दाखल झाले. त्यांनी इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना तातडीने इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे जखमींवर उपचार सुरु होता. पण उपचारादरम्यान बबली सिंग नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर तीन जखमींवर सध्या उपचार सुरु आहे. या घटनेवर इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कल्याणमध्येही भीषण अपघात
दुसरीकडे कल्याणमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. कल्याण शीळ रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आज (16 ऑक्टोबर) एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी दूरवर फेकली गेली आहे. गाडीचा चालक सुदैवाने बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. या नव्या भीषण अपघाताच्या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात होता. या दरम्यान पांडुरंगवाडी नजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्रटदाराने एक लोखंडी डिव्हायडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोराने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेले एका दुकानात सूरज भारद्वाज नावाचे रहिवासी झोपले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून त्यांनी रस्त्यावर धाव घेतली. यावेळी आणखी काहीजण आले. घटनास्थळी असलेल्या काहींनी गाडीतून आकाशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही.
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक
दरम्यान, अंबरनाथमध्येही दोन दिवसांपूर्वी भीषण अपघाताची घटना समोर आली होती. भरधाव बसने दुचाकीस्वाराला उडवून 10 ते 15 फूट लांब फरफटत नेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री ही घटना घडली. अंबरनाथच्या चिखलोली पाडा परिसरात राहणारे मंगेश पवार हे त्यांची पत्नी धनश्रीसोबत अंबरनाथहून विठ्ठलवाडीच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवर जात होते. यावेळी मागून आलेल्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली
अपघातामुळे तरुणाची प्रकृती गंभीर
पवार पती-पत्नीची दुचाकी अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला. यावेळी मागून आलेल्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. इतकंच नव्हे, तर त्यांना तब्बल 10 ते 15 फूट लांबपर्यंत फरपटत नेले. या अपघातात मंगेश पवार यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, छातीला दुखापत झाली असून पोटातही अंतर्गत दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांच्या पत्नीला मात्र काहीही इजा झालेली नाही. तर अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
हेही वाचा :