पुण्यात ‘स्पेशल 26’ चा थरार, आयटी अधिकारी बनले, सराफाला उचललं, सोनं नाणंही हिसकावलं पण नेमकं कुठं बिघडलं? वाचा सविस्तर
ठाण्यात चोरी करण्याच्या उद्देशात एका सराफ व्यावसायिकाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात एका सराफ व्यावसायिकाला लाखोंनी लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : ठाण्यात चोरी करण्याच्या उद्देशात एका सराफ व्यावसायिकाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात एका सराफ व्यावसायिकाला लाखोंनी लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी सराफाला इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याला गाडीत बसवत त्याचं अपहरण केलं. त्यानंतर आरोपींनी सराफाकडील 30 तोळे सोने आणि 20 लाख रुपये हिसकावून सराफाला गाडीतून खाली उतरवलं. त्यानंतर आरोपी पळून गेले.
पोलिसांकडून आरोपींना अवघ्या काही तासातच बेड्या
या घटनेमुळे सराफ व्यवसायिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी सराफाचं सर्व बोलणं ऐकून घेत आरोपींना लवकर बेड्या ठोकू असं आश्वासन दिलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर अवघ्या काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.
आरोपींपैकी एकजण हा सराफाचा मित्रच
पोलिसांनी याप्रकरणी काल (28 ऑगस्ट) रात्री उशिरा 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपींपैकी एकजण हा तक्रारदार सराफाचा मित्रच असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सराफाकडे किती पैसे आहेत याची माहिती त्याच्याकडेच होती. त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना याबाबत माहिती देत लुटमारीचा कट आखला. त्यानुसार त्यांनी सराफावर पाळत ठेवली.
आरोपींनी सराफाला लुटलं
अखेर संधी मिळताच आरोपींनी सराफाला एकटं हेरलं. आरोपींनी सराफाला गाडीत बसवत अपहरण केलं. यावेळी त्यांनी 30 तोळे सोने आणि 20 लाख रोख रुपये हिसकावून घेतले. आरोपींनी जांबूळवाडी रस्त्यावरील स्वामी नारायण मंदिराजवळ सर्व मुद्देमाल हिसकावला. त्यानंतर सराफाला तिथेच सोडून पळ काढला.
सराफ दुकान खरेदी करण्याच्या तयारीत असताना लुटीची घटना
संबंधित सराफ व्यावसायिक हे घरात बसूनच नथ बनवतात आणि अन्य सराफांना त्याचा पुरवठा करतात. त्यांना व्यवसायात चांगलं यश मिळाल्याने ते परिसरात एक दुकान घेण्याच्या विचारात होते. हीच बाब त्यांच्या एका मित्राला माहित पडली. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सराफाला लुटण्याचा कट आखला, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
बॉयफ्रेंड घरात असताना पती घरी आला, नंतर हाहा:कार, दुसऱ्या दिवशी नाल्यात मृतदेह