तरुणीसोबत आधी दोस्ती केली, नंतर नोकरीचं आमिष, कारमध्येच सामूहिक बलात्कार, पीडितेला हायवेवर फेकून दिलं
मुंबई, पुणे, अमरावती आणि बिहारमध्ये घडलेल्या बलात्काराच्या अमानुष घटना ताज्या असताना तामिळनाडूतही अशीच एक घटना समोर आली आहे.
चेन्नई : मुंबई, पुणे, अमरावती आणि बिहारमध्ये घडलेल्या बलात्काराच्या अमानुष घटना ताज्या असताना तामिळनाडूतही अशीच एक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. देशात एकामागेएक अशा वारंवार बलात्काराच्या घटना समोर येत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आरोपीने आधी तरुणीसोबत मैत्री केली, नंतर विश्वासघात
तामिळनाडूच्या कांचीपुरम भागात संबंधित घटना घडली आहे. पीडित तरुणी ही एका मोबईलच्या दुकानात काम करायची. तिथेच तिची आरोपी गुनासीलन याच्यासोबत ओळख झाली होती. आरोपी गुनासीलन याने पीडितेसोबत आधी मैत्री केली. तिला दुसरी चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दिलं. त्यामुळे पीडित तरुणीचा त्याच्यावर चांगला विश्वास बसला होता.
पीडितेवर सामूहिक बलात्कार
मैत्रीचा फायदा घेत आरोपी पीडितेला नोकरीच्या नावाने कांचीपुरम येथील एका फार्म हाऊसमध्ये घेऊन गेला. या दरम्यान कारमध्ये त्याने कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पीडितेला पाजवलं. त्यामुळे पीडिता बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने आपल्या चार मित्रांना बोलावलं. त्यांनी कारमध्येच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दरम्यान पीडिता शुद्धिवर आली. तिने आरोपींपासून सुटका मिळवण्यासाठी कारच्या खिडकीच्या काचांना लाथा मारल्या. कारमधील संशयास्पद हालचाल बघून स्थानिकांना संशय आला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला चेन्नई-बंगळुरु महामार्गावर फेकून देत धूम ठोकली.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पीडितेला तातडीने कांचीपुरमच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी 9 सप्टेंबरला मुख्य आरोपींसह चार आरोपींना बेड्या ठोकल्या. तर एक आरोपी फरार होता. पण पोलिसांनी 10 सप्टेंबरला त्याच्याही मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडितेचा मृत्यू
मुंबईतही एक अशीच घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.
पिंपरीत पोलीस असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार
तिकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
आरोपी विकास अवस्थीने पीडित महिलेला दुचाकीवरून घेऊन जात होता. त्यावेळी पीडित महिलेने प्रतिकार केला. पण तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, मी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सांगवी पोलीस स्टेशन मध्ये तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त विकास अवस्थी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :