Rupankar Bagchi: कोण आहे KK? असं विचारणारे गायक रुपांकर बागची यांच्यावर भडकले नेटकरी
अनेक सुपरहिट गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनाने देशभरातील चाहते हळहळले आहेत. अशातच एका बंगाली गायकाने सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध गायक केके (KK) यांचं मंगळवारी संध्याकाळी निधन झालं. केके कोलकाता इथं एक लाईव्ह शो करत होते, त्यादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अनेक सुपरहिट गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनाने देशभरातील चाहते हळहळले आहेत. अशातच एका बंगाली गायकाने सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बंगाली गायक रुपांकर बागची (Rupankar Bagchi) हे केके यांच्या मृत्यूच्या काही तास आधी फेसबुकवर लाइव्ह होते. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना रुपांकर यांनी केके यांच्या कॉन्सर्टबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. इतकंच नव्हे तर कोलकातामधील (Kolkata) गायक केकेपेक्षा चांगले गाऊ शकतात, असं ते म्हणाले. यावरून केके यांच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “मला फेसबुकच्या माध्यमातून कळलं की केके एका शोसाठी कोलकात्यात आहेत आणि त्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. मी माझ्यासह अनुपम रॉय, सोमता, इमान चक्रवर्ती, उज्जयिनी मुखर्जी, कॅक्टस, फॉसिल्स, रूपम इस्लाम आणि इतरांचे व्हिडिओ पाहिले आहेत. मला वाटतं आम्ही सगळे केकेपेक्षा चांगलं गातो. तुम्ही आमच्याही बाबतीत असा उत्साह का नाही दाखवत काय कारण आहे?”
पहा व्हिडीओ-
“केके कोण आहे? आम्ही केकेपेक्षा चांगले आहोत. मी ज्या गायकांचा उल्लेख केला, ते सर्व केकेपेक्षा खूप चांगले गायक आहेत”, असं ते पुढे म्हणाले. ‘बॉम्बे’मधल्या कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेल्या क्रेझवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी फेसबुक लाइव्ह संपवलं. प्रेक्षकांना त्यांनी दक्षिण, पंजाब आणि ओडिशामधील प्रादेशिक कलाकारांबाबत जाणून घेण्यास आवाहन केलं. “बंगाली आहात तर कृपया बंगालीसारखे रहा,” अशी खोचक टीका त्यांनी केली. यावरूनच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘तुम्हाला केके यांच्याविषयी ईर्षा आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘तुम्हाला तुरुंगात डांबलं पाहिजे’, अशा शब्दांत दुसऱ्याने युजरने राग व्यक्त केला. या ट्रोलिंगनंतर रुपनकर यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्ट केलं. केकेवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी बंगाली संगीत आणि संस्कृतीत रस दाखवा असं माझं म्हणणं होतं, असं ते म्हणाले.