Deepika Padukone: सेटवर दीपिकाची तब्येत बिघडताच प्रभासने घेतला मोठा निर्णय
हैदराबादमध्ये 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत ती 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचं शूटिंग करत होती. हृदयाचे ठोके वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला हैदराबाद (Hyderabad) इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबादमध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभाससोबत ती ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचं शूटिंग करत होती. हृदयाचे ठोके वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता दीपिकाची प्रकृती ठीक असून सहकलाकार प्रभासने तिच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दीपिका आणि प्रभास हे रामोजी फिल्म सिटीमध्ये आठवडाभर शूटिंग करणार होते. मात्र आता ती पूर्णपणे बरी होईपर्यंत प्रभासने शूटिंग शेड्युल पुढे ढकलण्यास सांगितलं आहे.
“दीपिका आणि प्रभास यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण सीन्स तिथे शूट होणार होते. पण प्रभासने शूटिंगचं शेड्युल पुढे ढकलण्यास सांगितलं. आता एक आठवड्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात होईल. दीपिकाची प्रकृती स्थिर असून तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. तिला बरं वाटल्यास शूटिंगला पुन्हा सुरुवात होईल. प्रभासने तिच्यावर तो निर्णय सोपवला आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या कामाचं शेड्युल अत्यंत व्यग्र असल्याने तब्येत बिघडल्याचं म्हटलं जातंय. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दीपिका परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. कानवरून परतताच तिने लगेच शूटिंगला सुरुवात केली. या सर्व घडामोडींदरम्यान तिला पुरेसा आराम मिळाला नाही. दीपिका रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. मात्र थोड्या वेळानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रोजेक्ट के या चित्रपटात दीपिका आणि प्रभास यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबत काम करतेय. याशिवाय ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.