करण, आमिर की शाहरुख.. अटकेसाठी जबाबदार कोण? KRK नं सांगितलं सत्य
सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी केआरकेसाठी न्यायाची मागणी केली. तर काहीजण करण जोहर आणि आमिर खानला मास्टरमाईंड म्हणत होते. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेनं अटकेमागच्या सत्यावरून पडदा उचलला आहे.
अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान (Kamaal R Khan) याला नुकताच जामिन मंजूर झाला. वादग्रस्त ट्विट आणि विनयभंग प्रकरणात त्याला अटक झाली होती. दुबईहून मुंबईत परतताच विमानतळावर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर आणि करण जोहर (Karan Johar) निर्मित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केआरकेला अटक झाल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी केआरकेसाठी न्यायाची मागणी केली. तर काहीजण करण जोहर आणि आमिर खानला मास्टरमाईंड म्हणत होते. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेनं अटकेमागच्या सत्यावरून पडदा उचलला आहे.
केआरकेनं नुकतंच ट्विट करत लिहिलं, ‘अनेकजण म्हणत आहेत की माझ्या अटकेच्या मागे करण जोहरचा हात होता. मात्र हे सत्य नाही. करण जोहर, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार या सर्वांचं माझ्या अटकेशी काहीच देणंघेणं नाही.’
Many people are saying that @karanjohar was behind my arrest. No, it’s not true. #Karan #SRK #Aamir #Ajay #Akshay etc have nothing to do with my arrest.
— KRK (@kamaalrkhan) September 14, 2022
तुरुंगातील 10 दिवस कसे काढले याविषयीसुद्धा त्याने एक ट्विट केलं होतं. ‘लॉकअपमध्ये असताना दहा दिवस मी फक्त पाणी पिऊन जगलोय. त्यामुळे माझं 10 किलो वजन कमी झालंय’, असं ट्विट केआरकेनं केलं. अवघ्या काही मिनिटांतच त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.
2020 मध्ये कमाल आर खानने दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं. याच ट्विटवरून त्याला अटक करण्यात आली होती. मूळचा उत्तरप्रदेशमधील सहारनपूर इथला असलेला केआरके काही हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. त्याने सितम आणि देशद्रोही यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. सध्या तो देशद्रोही 2 या सीक्वेलवर काम करत आहे. 2014 मध्ये तो ‘एक व्हिलन’ या चित्रपटातही झळकला होता.