Neetu Chandra: “माझी पत्नी बनण्यासाठी दरमहा 25 लाख रुपये देतो”; व्यावसायिकाने अभिनेत्रीला दिली होती ऑफर
नीतूने 2005 मध्ये 'गरम मसाला' (Garam Masala) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एअर होस्टेसची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओय लकी लकी ओय, अपार्टमेंट 13 बी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
अभिनेत्री नीतू चंद्राने (Neetu Chandra) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. एका व्यावसायिकाने नीतूला त्याची पत्नी (salaried wife) बनण्यासाठी ऑफर दिल्याचं तिने सांगितलं. यासाठी तो तिला दरमहा 25 लाख रुपये देणार असं म्हणाला. या मुलाखतीत नीतू तिच्या करिअरविषयीसुद्धा व्यक्त झाली. 13 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत काम करूनसुद्धा आता तिच्या हातात ना काम ना पैसा असल्याचं तिने सांगितलं. एका ऑडिशनमध्ये कास्टिंग डायरेक्टरने तिला तासाभरात रिजेक्ट केल्याचा किस्साही तिने यावेळी सांगितला. नीतूने 2005 मध्ये ‘गरम मसाला’ (Garam Masala) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एअर होस्टेसची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओय लकी लकी ओय, अपार्टमेंट 13 बी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत नीतू म्हणाली, “माझी कथा म्हणजे एका यशस्वी अभिनेत्रीची अयशस्वी ठरलेली कथा आहे. 13 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम करूनसुद्धा माझ्याकडे आज काम नाही. मला एका मोठ्या व्यावसायिकाने ऑफर दिली होती की मी तुला 25 लाख रुपये दह महिन्याला पगार म्हणून देईन आणि त्याबदल्यात तुला माझी पत्नी बनावी लागेल. सध्या माझ्याकडे काम नाही आणि पैसाही नाही. एवढं काम करूनसुद्धा इंडस्ट्रीत माझी काहीच किंमत नसल्यासारखं मला वाटतंय.”
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
“एका कास्टिंग डायरेक्टरने ऑडिशनदरम्यान अवघ्या तासाभराच्या आत मला सांगितलं की, नीतू मला माफ कर पण मी तुला भूमिका देऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्ही माझा आत्मविश्वास तोडण्यासाठी मला ऑडिशनला बोलावलं आणि त्यानंतर थेट नकार दिला”, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला. नीतूने ‘नेव्हर बॅक डाऊन: रिव्हॉल्ट’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं.
इंडस्ट्रीविषयी नीतूने याआधी दिलेल्या मुलाखतीतही राग व्यक्त केला होता. “लोकांना माझ्याबद्दल खूप आश्चर्य वाटतंय की मी माझ्या बळावर हॉलिवूड प्रोजेक्ट कसा मिळवला? त्यांना धक्का बसतोय की कोणाचाही पाठिंबा नसताना मी इतकी पुढे कशी जातेय”, असं ती ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. शेफाली शाह, राहुल बोस आणि सुमीत राघवन यांच्यासोबत ती ‘कुछ लव्ह जैसा’ या चित्रपटात शेवटची झळकली. ओय लकी लकी ओय या चित्रपटाला सर्वांत लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.