Raveena Tandon: ‘तुझ्यापेक्षा सोनम बरी’, औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं समर्थन करणाऱ्या रवीनावर भडकले नेटकरी
मग भारतात कोणाला ओसामा, कसाब, अफझल गुरू, यासीन मलिक, हाफिज सईद, मसीद अझहर यांची पूजा करायची असेल तरी आपण त्याला ठीक म्हणावं का, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. त्यावर रवीनाने (Raveena Tandon) प्रत्युतर दिलं.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर डोकं टेकलं होतं. त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना अभिनेत्री रवीन टंडनने (Raveena Tandon) त्यांच्या या कृत्याचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. रवीनाने यासंदर्भात एक ट्विट केलं असून त्या ट्विटमुळे तिला ट्रोल केलं जातंय. ‘काही काळापूर्वी माझ्या मातृभूमीला ‘असहिष्णू’ असं लेबल लावणं म्हणजे एक फॅशन बनलं होतं. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता कुठे आहे’, असा सवाल तिने केला होता. ‘तुझ्यापेक्षा सोनम कपूर बरी’, असं म्हणत नेटकऱ्यांनी रवीनावर टीका केली. या टीकाकारांनाही रवीनाने प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
रवीनाने लेखक आनंद रंगनाथन यांचं एक ट्विट शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. हा एक स्वतंत्र देश आहे आणि इथे कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहे’, असं रवीनाने या ट्विटमध्ये लिहिलं होतं. लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकणाऱ्या ओवैसींचा फोटो शेअर करताना निशाणा साधला होता. त्याउलट रवीनाने ओवैसींचं समर्थन केलं.
रवीनाच्या या ट्विटवरून विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या. ‘काय मूर्खपणाचं ट्विट आहे. मग भारतात कोणाला ओसामा, कसाब, अफझल गुरू, यासीन मलिक, हाफिज सईद, मसीद अझहर यांची पूजा करायची असेल तरी आपण त्याला ठीक म्हणावं का? कारण सहिष्णु देशात समान हक्क म्हणजे हेच बरोबर ना? आता तुझ्यापेक्षा सोनम कपूरची मतं बरी वाटू लागली आहेत,’ असं एकाने लिहिलं.
नेटकऱ्याला रवीनाचं प्रत्युत्तर-
त्या नेटकऱ्याला उत्तर देताना रवीनाने लिहिलं, ‘हाहाहा, दुर्दैवाने तुम्हाला असे बरेच लोक सापडतील जे अगदी सैतानाचीही आणि तुम्ही खाली दिलेल्या यादीतल्या लोकांचीही पूजा करत असतील. ज्यांना समजायचं होतं त्यांना समजलं.’
अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेना आणि भाजपनं त्यावर प्रतिक्रिया दिली होती. औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं, “मुस्लीम लोक औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत. कारण औरंगजेब दुष्ट होता. मुस्लीम आणि हिंदू समाजाला त्याने त्रास दिला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”
“मुस्लीम असले तरी त्यांनी राष्ट्रभक्तीनं राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावण्याचं काम त्यांच्या या कृतीने होत आहे, त्याचा आम्ही निषेध करते”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली होती.