Sameera Reddy: ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ’; प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याबद्दल व्यक्त झाली समीरा रेड्डी
नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमध्ये तिने प्रसूतीनंतरच्या नैराश्याबद्दल (postpartum depression) सांगितलं आहे. मी जेव्हा पहिल्या बाळाला जन्म दिला, तेव्हा अत्यंत आनंदाच्या क्षणीसुद्धा मी खूप दुःखी होती, असं तिने त्यात लिहिलंय आणि त्यावेळचा फोटोही शेअर केला आहे.
जवळपास 20 वर्षांपूर्वी ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) ही सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी अनेकदा सोशल मीडियावर ती विविध कारणांमुळे चर्चेत असते. आयुष्यातील अनेक चढ-उतारांविषयी ती सोशल मीडियावर (Social Media) मोकळेपणाने बोलते आणि त्यातून चाहत्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते. नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमध्ये तिने प्रसूतीनंतरच्या नैराश्याबद्दल (postpartum depression) सांगितलं आहे. मी जेव्हा पहिल्या बाळाला जन्म दिला, तेव्हा अत्यंत आनंदाच्या क्षणीसुद्धा मी खूप दुःखी होती, असं तिने त्यात लिहिलंय आणि त्यावेळचा फोटोही शेअर केला आहे.
‘रेस’, ‘दे दना दान’ आणि ‘डरना मना है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या समीरा रेड्डीने इन्स्टाग्रामवर कोलाज बनवून दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिचं खूप वजन वाढलेलं दिसतंय आणि तिच्या मांडीवर तिचं मूल आहे. या आनंदाच्या क्षणीही तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तिचा मुलगा थोडा मोठा झाला आहे आणि समीरा त्यात पूर्वीपेक्षा थोडी फिट दिसत आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. या फोटोसोबत समीराने मानसिक आजाराविषयी सांगितलं आहे. अनेकदा हा आजार तुम्हाला दिसून येत नाही, पण त्याचे परिणाम खूप गंभीर असतात, असं तिने म्हटलंय.
प्रसूतीनंतर येणारं नैराश्य हे अत्यंत वाईट असतं आणि त्या टप्प्यातून आपण गेल्याचं तिने सांगितलंय. ‘माझ्यासाठी प्रसूतीनंतरचा काळ खूप कठीण होता आणि मी त्यावर लवकर उपाय करू शकले नाही, कारण मला त्याबद्दल काहीच माहित नव्हतं. मी या पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळाचा आहे. माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मी खूप प्रयत्न केले, पण मी आनंदी राहूच शकले नाही. मी अजूनही त्या क्षणांचा विचार करते तेव्हा अशा नैराश्याचा सामना करणाऱ्यांना त्याबद्दल सांगणं मला अजूनही कठीण जातं. पण यात तुम्ही एकटे नाही आहात. कठीण काळात एकमेकांची साथ देणं खूप महत्वाचं असतं,’ असं समीराने लिहिलंय.
समीराची पोस्ट-
View this post on Instagram
यासोबतच समीराने स्वतःच्या आणि इतरांच्या मदतीसाठी आपण काय करू शकतो हे देखील सांगितलं आहे. यामध्ये तिने पुढे लिहिलं, ‘स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या भावनिक आरोग्याबद्दल जागरूक रहा, एखाद्याविषयी मतं न बनवता त्याचं ऐका. तुम्हाला जे वाटतं ते शेअर करा, 8 तासांची झोप घ्या, स्क्रीनचा (मोबाइल, लॅपटॉप) वापर कमी करा. तुम्ही काय खाता याची काळजी घ्या. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या बोलू नका. नवीन गोष्ट शिका. अर्धा तास व्यायाम करा. मित्र, कुटुंबातील सदस्यांना भेटा.’ समीराने 2014 मध्ये व्यावसायिक अक्षय वरदे याच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.