Mallika Sherawat: “त्यावेळी अक्षरश: माझा मानसिक छळ केला”; मल्लिका शेरावतने सांगितला इंडस्ट्रीतला अनुभव
यावेळी तिने 2004 मधील तिच्या 'मर्डर' (Murder) या चित्रपटाची तुलना दीपिका पदुकोणच्या 'गेहराईयाँ' (Gehraiyaan) या चित्रपटाशी केली. जे दीपिकाने 'गेहराईयाँ' या चित्रपटात केलं, तेच मी मर्डर या चित्रपटात केलं होतं, असं मल्लिका म्हणाली.
अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) बॉलिवूडमध्ये बऱ्याच बोल्ड भूमिका साकारल्या. मात्र याच भूमिकांमुळे तिला अनेकदा वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मल्लिका त्या अनुभवांविषयी व्यक्त झाली. इंडस्ट्रीतील काही जण फक्त माझ्या शरीराविषयी, ग्लॅमरविषयी बोलतात, पण माझ्या अभिनयाविषयी बोलत नाहीत, अशी खंत तिने व्यक्त केली. यावेळी तिने 2004 मधील तिच्या ‘मर्डर’ (Murder) या चित्रपटाची तुलना दीपिका पदुकोणच्या ‘गेहराईयाँ’ (Gehraiyaan) या चित्रपटाशी केली. जे दीपिकाने ‘गेहराईयाँ’ या चित्रपटात केलं, तेच मी मर्डर या चित्रपटात केलं होतं, असं मल्लिका म्हणाली. शकुन बत्रा दिग्दर्शित गेहराईयाँ या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारल्या होत्या. मॉडर्न रिलेशनशिपची दुसरी बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली होती.
“पूर्वी नायिका सती-सावित्री असायच्या किंवा मग थेट चारित्र्यहीन”
प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका म्हणाली, “पूर्वी नायिका एकतर खूप चांगल्या, सती-सावित्रीसारख्या दाखवल्या जायच्या. ज्यांना कशातलंच काही कळत नव्हतं किंवा मग त्या चारित्र्यहीन तरी दाखवल्या जायच्या. नायिकांसाठी लिहिलेल्या या दोनच प्रकारच्या भूमिका होत्या. आता त्यात बरेच बदल झाले आहेत. आता महिलांना माणूस म्हणून दाखवलं जातं. ती आनंदी किंवा दुःखी असू शकते, ती चुका करू शकते, ती गोंधळात पाडू शकते आणि हे सर्व असूनही तुम्ही तिच्यावर प्रेम करता.”
पहा फोटो-
View this post on Instagram
“किस, बिकिनीबद्दल वाट्टेल ते बोललं जायचं”
“हल्लीच्या अभिनेत्रींना त्यांच्या शरीरावर अधिक विश्वास असतो. पण मी जेव्हा मर्डर हा चित्रपट केला होता, तेव्हा प्रचंड टीका आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. किस आणि बिकिनीबद्दल लोक वाट्टेत ते बोलायचे. दीपिका पदुकोणने जे गेहराईयाँ या चित्रपटामध्ये केलं होतं, तेच मी 15 वर्षांपूर्वी केलं होतं. परंतु लोक तेव्हा खूप संकुचित मनोवृत्तीचे होते. इंडस्ट्री आणि मीडियाचा एक वर्ग अक्षरश: माझा मानसिक छळ करत होते. हे लोक फक्त माझ्या बॉडी आणि ग्लॅमरबद्दल बोलत होते, पण माझ्या अभिनयाबद्दल बोलायला कोणीच तयार नव्हतं. मी दशावतारम, प्यार के साइड इफेक्ट्स आणि वेलकममध्ये काम केलं. पण माझ्या अभिनयाबद्दल कोणीच काही बोललं नाही”, अशी खंत तिने व्यक्त केली.
अनुराग बसू दिग्दर्शित मर्डर या चित्रपटात मल्लिका शेरावतने इम्रान हाश्मीसोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटातील इम्रान आणि मल्लिका यांच्या बोल्ड दृश्यांची त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मल्लिका आता लवकरच आरके/आरके या चित्रपटात झळकणार आहे. रजत कपूर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात कुब्रा सैत, रणवीर शौरे, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजीत देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्होरा यांच्याही भूमिका आहेत.