B Praak: ‘क्षणार्धात तो आम्हाला सोडून गेला’; बाळाला गमावल्यानंतर गायक बी प्राकच्या पत्नीची भावूक पोस्ट
डिलिव्हरीच्या वेळी मीरा आणि प्राकच्या बाळाने आपला जीव गमावला. बी. प्राकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही दु:खद बातमी सांगितली होती. आता मीराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर बाळासाठी (Baby) भावूक पोस्ट लिहिली आहे.
नऊ महिने बाळाला गर्भात वाढवल्यानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक पालक आतूर असतो. बाळाचा चेहरा पहिल्यांदा पाहिल्यानंतर सर्व वेदना क्षणार्धात नाहीशा होतात. मात्र हाच क्षण प्रसिद्ध गायक बी प्राक आणि त्याची पत्नी मीरा अनुभवू शकले नाहीत. बी प्राक (B Praak) आणि त्याची पत्नी मीरा बच्चन (Meera Bachan) यांच्यावर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. डिलिव्हरीच्या वेळी मीरा आणि प्राकच्या बाळाने आपला जीव गमावला. बी. प्राकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही दु:खद बातमी सांगितली होती. आता मीराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर बाळासाठी (Baby) भावूक पोस्ट लिहिली आहे. बी प्राकची पत्नी मीराने या वर्षी एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली होती.
बी प्राकच्या पत्नीची भावनिक पोस्ट
मीराने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिलं की, ‘स्वर्गात एक खास देवदूत आहे जो माझाच एक भाग आहे. तो तिथे असावा असं मला कदापि वाटत नव्हतं. पण ती देवाची इच्छा होती. एखाद्या शूटिंग स्टारप्रमाणे तो इथे आला आणि क्षणार्धात आम्हाला सोडून तो स्वर्गात गेला. एखाद्या देवदूताप्रमाणे त्याने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केलं. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं असतं. तू माझ्या सोबत नसलास तरी मी तुझ्यावर प्रेम करणं कधीच थांबवणार नाही. मी प्रत्येक क्षणी तुझा विचार करते.’
मीराची पोस्ट-
View this post on Instagram
‘तुझं छोटं हृदय इतके महिने खूप जोरात धडधडत होतं, ते आता शांत आहे. इतके महिने तुझ्या छोट्या हातापायांच्या हालचाली होत होत्या, आता ते थांबले आहेत. तुला मोठं होताना, तुला घट्ट धरून ठेवतानाचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं. तुझी आई तुझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करेल आणि सत्य हेच आहे की तू होतास, तू आहेस आणि नेहमीच माझा राहशील. मी तुझ्यावर खूप प्रेम करते,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मीरा यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या. 4 एप्रिल 2019 मध्ये बी प्राक आणि मीराने लग्नगाठ बांधली. तर 2020 मध्ये मीराने मुलाला जन्म दिला. बी प्राकचं खरं नाव प्रतीक बच्चन असं आहे. त्याने अनेक हिंदी आणि पंजाबी गाणी गायली आहेत.