Salman Khan: “ते व्हिडीओ केवळ बदनामीकारकच नाही तर जातीय तेढ निर्माण करणारे”; शेजाऱ्याविरोधात सलमानने घेतली हायकोर्टात धाव
पनवेलच्या फार्महाऊसमध्ये कलाकार काय करतात हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल सलमानने कक्कडविरुद्ध हा खटला दाखल केला होता.
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल फार्महाऊसच्या शेजाऱ्याचा खटला मुंबई उच्च न्यायालयात (High Court) पोहोचला आहे. शुक्रवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सलमान खानच्या वतीने सांगण्यात आलं की, पनवेल फार्महाऊसचा त्याचा शेजारी केतन कक्कडच्या (Ketan Kakkad) सोशल मीडियावरील पोस्ट या केवळ बदनामीकारकच नाहीत तर जातीय तेढ निर्माण करणारे आहेत. न्यायमूर्ती सीव्ही भद्रंग यांनी सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी केली. मार्च 2022 मध्ये दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सलमानने हा अर्ज दाखल केला होता. सलमान खानने शेजाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्याला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. पनवेलच्या फार्महाऊसमध्ये कलाकार काय करतात हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल सलमानने कक्कडविरुद्ध हा खटला दाखल केला होता.
केतन कक्कडला हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सलमान खानने न्यायालयाला केली होती. तसंच भविष्यात त्याला आपल्याविषयी भाष्य करण्यापासून रोखावं अशी मागणी सलमानने केली होती. दिवाणी न्यायालयाने असा आदेश देण्यास नकार दिल्यावर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी सलमान खानचे वकील रवी कदम यांनी दिवाणी न्यायालयाचा आदेश न देणं चुकीचे असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “कक्कड यांनी अपलोड केलेले व्हिडिओ केवळ बदनामीकारक नाहीत तर जातीय तेढ निर्माण करणारे आहेत.”
व्हिडिओमध्ये सलमानवर गंभीर आरोप
व्हिडिओची स्क्रिप्ट वाचून रवी कदम म्हणाले, “कक्कड यांनी अल्पसंख्याक समाजातील सलमान खानबद्दल असं म्हटलंय की त्याला त्याच्या पनवेल फार्महाऊसजवळील गणेशाचं मंदिर बळकावायचं आहे. इतकंच नव्हे तर व्हिडिओमध्ये कक्कड यांनी सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेबशी केली आहे. तो म्हणतोय की अयोध्या मंदिर बांधायला 500 वर्षे लागली आणि इथे सलमान खानला गणेश मंदिर बंद करायचं आहे.”
सलमानचे वकील पुढे म्हणाले, “हा व्हिडिओ लाखो प्रेक्षकांनी पाहिले आहेत. या युजर्सनी व्हिडीओवर सलमान खानविरोधातही कमेंट केली आहे. अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे प्रेक्षकांना स्पष्टपणे सलमान खानविरोधात भडकावण्यात आलं आहे. व्हिडिओने हा मुद्दा सांप्रदायिक केला असून हिंदू विरुद्ध मुस्लिम वाद सुरू केला आहे.” सलमान हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य असल्याचा आरोपही कक्कड यांनी केल्याचा रवी कदम यांनी म्हटलं आहे. सलमान त्याच्या फार्महाऊसमधून अमली पदार्थांची तस्करी, अवयवांची तस्करी आणि मुलांची तस्करी करत असल्याचा आरोप कक्कड यांनी केला आहे.
या सुनावणीनंतर न्यायालयाच्या खंडपीठाने 22 ऑगस्टची पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. केतन कक्कडचे वकील आभा सिंग आणि आदित्य सिंग यांनी ट्रायल कोर्टात दावा केला होता की, सलमान खानने त्याची जमीन बळकावण्यासाठी त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.