Vivek Agnihotri: ‘द काश्मीर फाईल्स’वरून अनुराग कश्यपवर भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले “हे लोक..”
ऑस्करसाठी जर RRR हा चित्रपट भारताकडून पाठवला गेला असता तर तो टॉप 5 मध्ये स्थान नक्कीच मिळवू शकला असता, असं अनुराग म्हणाला. त्याचवेळी त्याने द काश्मीर फाइल्सचाही (The Kashmir Files) उल्लेख केला. यामुळेच विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दोबारा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तो असं काही बोलला, ज्यामुळे तो ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) निशाण्यावर आला आहे. या मुलाखतीत अनुरागने एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाचं कौतुक केलं. ऑस्करसाठी जर RRR हा चित्रपट भारताकडून पाठवला गेला असता तर तो टॉप 5 मध्ये स्थान नक्कीच मिळवू शकला असता, असं अनुराग म्हणाला. त्याचवेळी त्याने द काश्मीर फाइल्सचाही (The Kashmir Files) उल्लेख केला. यामुळेच विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.
काय म्हणाला अनुराग कश्यप?
अनुरागने सांगितलं की RRR हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीमध्ये टॉप 5 मध्ये आपलं स्थान बनवू शकला असता, किंबहुना तो पुरस्कार देखील जिंकू शकला असता. मला वाटतं की द काश्मीर फाइल्स हा चित्रपट भारताने ऑस्करसाठी पाठवायला पाहिजे नव्हता.
अनुरागवर व्यक्त केला राग
अनुरागच्या या वक्तव्यावर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत राग व्यक्त केला. त्यांनी ट्विट केलं की, ‘नरसंहारावर विश्वास न ठेवणाऱ्या बॉलिवूडच्या लॉबीने द काश्मीर फाईल्सविरोधात मोहीम सुरू केली आहे. हे सर्व ‘दोबारा’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या नेतृत्वाखाली घडत आहे.’
अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्टला जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि अनुराग तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. दोघांनी यापूर्वी ‘मनमर्जियां’ आणि ‘सांड की आँख’मध्ये एकत्र काम केलं होतं. या दोन्ही चित्रपटांचा निर्माता अनुराग कश्यप होता.